चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई होणार; एमपीएससी प्रकरणावर विक्रम पाचपुतेंची स्पष्ट भूमिका

आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध मागण्या, अडचणी आणि भूमिका जाणून घेतली.

Untitled Design   2026 09 06T212627.941

Untitled Design 2026 09 06T212627.941

Vikram Pachpute’s clear stance : एमपीएससी विद्यार्थ्यांकडून उद्या पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध मागण्या, अडचणी आणि भूमिका जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघर्षाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत शिक्षकांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडून उद्या काढण्यात येणारा आक्रोश मोर्चा संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने होत असेल, तर सरकारचा त्याला कोणताही विरोध नाही. मोर्चाला परवानगी देण्यात आली असून, तो रद्द करण्याची सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडाव्यात आणि सरकार त्या ऐकून घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर करण्याऐवजी ते प्रत्यक्षात कसे सोडवता येतील, यावर भर देण्याची गरज असल्याचे पाचपुते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचल्या असून, संवादाच्या माध्यमातून त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही पाचपुते यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. त्यामुळे राज्य सरकारला थेट अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. मात्र नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा की नाही, हा संबंधित व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आत्महत्येपूर्वी दोन व्हिडीओ, वरिष्ठांवर गंभीर आरोप; नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने संपवलं जीवन

आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही पाचपुते यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यास कोणतीही हरकत नाही. लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडलेच पाहिजेत, मात्र त्या प्रश्नांचा तात्काळ राजकीय वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही पाचपुते यांनी दिली. या समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट समितीसमोर यावे आणि त्यांच्या शंका तसेच प्रश्नांचा विचार व्हावा, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, SIR प्रक्रियेबाबत बोलताना पाचपुते यांनी नियमानुसार पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अद्याप सुरू असून, पात्र नागरिकांना नियमानुसार मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, उद्याच्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संवादाची भूमिका घेतली असून विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका आमदार विक्रम पाचपुते यांनी मांडली.

Exit mobile version