केतन अग्रवाल हत्याकांडात मोठा ट्विस्ट; चेतनसोबतचं डिलीट व्हाट्सॲप चॅट रिकव्हर, वर्गमित्र अटकेत
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून रितेश हिंगे असं त्याचं नाव आहे.
Major twist in the Ketan Agrawal murder case : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून रितेश हिंगे असं त्याचं नाव आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून दोघेही सध्या तुरुंगात आहेत. रितेश हा सिया आणि चेतन यांचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली होती. आता तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी रितेश हिंगेलाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या कथित कटाबाबत रितेशला आधीपासून माहिती होती, असा संशय आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यात झालेल्या व्हाट्सॲप संभाषणाच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. संबंधित संभाषण रितेशने डिलीट केलं होतं. मात्र पोलिसांनी हे चॅट रिकव्हर केल्यानंतर तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.
काळाच्या शंभर वर्ष पुढे विचार करणारा माणूस, पण… विद्यानंद बापटांबाबत विश्वंभर चौधरींची पोस्ट
विशेष म्हणजे केतनचा मृत्यू झाला त्या 18 जून रोजी सिया आणि चेतन यांनी रितेशला त्यांच्यासोबत लोहगडावर येण्यास सांगितलं होतं, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. मात्र रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. हत्येनंतरही सिया आणि चेतन हे रितेशच्या संपर्कात होते, असंही तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. चेतनने रितेशला हत्येच्या कथित कटाची माहिती दिली होती का, रितेशला या प्रकरणाबाबत नेमकी किती माहिती होती आणि डिलीट करण्यात आलेल्या व्हाट्सॲप चॅटमध्ये काय संभाषण झालं होतं, याचा आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या वर्गमित्रालाही अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.