Vintage cars in the Pune to Mahabaleshwar rally : जुन्या काळाचा रुबाब, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडी, शांत पण दमदार इंजिनाचा आवाज, हलके स्टिअरिंग आणि क्लासिक हॅन्डगिअर… अशा देखण्या फियाट गाड्यांचा अनोखा नजराणा पुणेकरांना अनुभवायला मिळाला. फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ या रॅलीत 1955 पासूनच्या विविध मॉडेल्सच्या 20 हून अधिक क्लासिक गाड्यांनी सहभाग घेतला.
पुणे शहरातून निघालेला हा ताफा निसर्गरम्य घाटमार्गाने महाबळेश्वरकडे रवाना झाला. रस्त्याच्या कडेला उभे राहून नागरिकांनी या देखण्या गाड्यांचे छायाचित्रण केले, तर वाहनप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात सहभागींना दाद दिली. काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या आणि हिरव्या अशा विविध रंगांतील या व्हिंटेज कार्सनी रस्त्यावर जणू इतिहास जिवंत केल्याची अनुभूती दिली.
रॅलीचे आयोजक संजय प्रकाश ढेरे म्हणाले, क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीत या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. त्यांनी पुढे सांगितले की, क्लबचे सदस्य आपल्या गाड्यांची मूळ रचना आणि वैशिष्ट्ये जपून ठेवतात. या गाड्यांमधून महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात.
तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल
ढेरे यांनी आपल्या भावनिक नात्याविषयी बोलताना सांगितले, ही गाडी माझ्या वडिलांची असल्यामुळे तिच्याशी माझा विशेष भावनिक बंध आहे. ती चालवताना वडिलांचा सहवास मिळाल्यासारखे वाटते. सहभागी शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, माझ्याकडे 1991 मधील फियाट कार आहे. ही गाडी आमच्या कुटुंबासाठी केवळ वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे.
तिची देखभाल आम्ही स्वतः करतो. अशा रॅलीत सहभागी होताना तिचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते. क्लासिक फियाट गाड्यांच्या या वारीने पुणेकरांना जुन्या आठवणींमध्ये रमवले आणि ऑटोमोबाईल इतिहासाचा थेट अनुभव देत महाबळेश्वरच्या दिशेने एक देखणा प्रवास घडवून आणला.
