World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील हंगामासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. 2027 पासून सुरु होणाऱ्या नवीन हंगामात 12 संघ खेळताना दिसणार आहे. आयसीसीच्या दुबई येथे झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदिवसीय सुपर लीग सुरु होण्याची शक्यता आहे. या विषयावर लवकरच आयसीसीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार न्यूझीलंडचे माजी खेळाडू रॉजर टूसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या आठवड्यात दुबई येथे झालेल्या तिमाही बैठकींमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्ड आणि मुख्य कार्यकारी समिती (CEC) यांना खेळाच्या सर्व स्वरूपांमधील सध्याच्या समस्यांवर विचार करण्यासाठी त्यांच्या शिफारसी सादर केल्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील हंगामासाठी या संघांना मिळणार संधी
तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2027 पासून सुरु होणाऱ्या नव्या हंगामासाठी संघांची संख्या 9 वरुन 12 करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाला देखील संधी देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. सध्या सुरू असणाऱ्या हंगामात अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंडला स्पर्धेचा भाग मानले जात नव्हते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवीन हंगाम 2027 पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघाला विशिष्ट संख्येने कसोटी सामने खेळावे लागणार आहे.
या संघांनी द्विस्तरीय सिस्टिमला केला विरोध
तर या बैठकीत वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या द्वस्तरीय सिस्टिमला विरोध केला आहे. प्रमुख संघांविरुद्ध खेळण्याच्या त्यांच्या शक्यता मर्यादित होत असल्याने या संघांनी या सिस्टिमला विरोध केला असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.
