लखनऊ सुपर जायंट्सला पाणी पाजून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने लखनऊवर तब्बल 81 रन्सनी विजय संपादन केला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज आकाश मधवाल. आकाशने 3.3 ओव्हर्समध्ये अवघ्या 5 रन्स देत 5 विकेट काढल्या. त्याच्या जबरदस्त स्पेलमुळे पूर्ण मॅचचा चेहरा मोहराच बदलून गेला. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे मुंबईचे दोन्ही प्रमुख गोलंदाज अनुपस्थित असताना आकाशने मुंबईला मोठा विजय मिळवून दिला. मॅच संपल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानेही आकाशचे तोंडभरुन कौतुक केले. दरम्यान, आकाशच्या या उत्तुंग कामगिरीमुळे तो नेमका कोण आहे, तो कुठला आहे याबद्दल गुगलवर सर्च करण्यास सुरुवात केली आहे. (Akash Madhwal,who became the first bowler to pick a five-wicket haul in the history of IPL playoffs)
उत्तराखंड संघाकडून IPL खेळणारा पहिला खेळाडू :
आकाश गेल्या वर्षीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला होता. सूर्यकुमार यादव जखमी झाल्यानंतर त्याला संघात सामील करण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण या मोसमात जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर संघाबाहेर गेल्यानंतर आकाशला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर या २९ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने ही संधी दोन्ही हातांनी पकडली.
वसीम जाफरने शोधलेल्या ‘आकाश’ची उत्तुंग भरारी :
आकाश मूळचा उत्तराखंडचा. प्रथम श्रेणी क्रिकेटही तो उत्तराखंडच्या संघासाठीच खेळतो. आयपीएल खेळणाराही तो उत्तराखंड संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. आकाशचा जन्म 25 नोव्हेंबर 1993 रोजी झाला. 2013 मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत आकाशच्या वडिलांचे निधन झाले. आकाशला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती, पण त्याने ते सोडून इंजिनिअरींग करण्याचे ठरवले. इंजिनीअरिंगच्या काळात आकाश फक्त टेनिस बॉलने खेळत होता. इंजिनीअरिंगनंतर आकाशने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत आकाश फक्त टेनिस बॉलने खेळत होता. त्याने लेदर बॉल हातात देखील घेतला नव्हता.
आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर
2019 मध्ये एकदा तो उत्तराखंड क्रिकेट असोएशने आयोजित केलेल्या ट्रायलसाठी गेला होता. त्यावेळी त्याने उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक आणि भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सध्याचे प्रशिक्षक मनीष झा देखील त्याच्यावर खूप प्रभावित झाले. मनीष झा यांनी त्याला संघात सामील करून घेतले आणि आकाशला तयार करण्यास सुरुवात केली. टेनिस बॉल खेळल्यामुळे आकाशकडे वेग होता, पण त्याला लेदर बॉलने सरावाची गरज होती.
उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक मनीष झा यांनी सांगितले, 2019 मध्ये जेव्हा आकाश ट्रायलसाठी आला तेव्हा त्याची बॉलिंग अॅक्शन सरळ आणि वेगवान होती. आम्हाला त्याच्यात एक एक्स-फॅक्टर दिसला. वसीम भाईने त्याला थेट संघात घेतले आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात संधी दिली. पुढे कोविडच्या काळात रणजी ट्रॉफी रद्द झाली. त्यावेळीच मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा मी आकाशला उत्तराखंडसाठी तिन्ही फॉरमॅट खेळणार असल्याचे सांगितले. मी त्याला आश्वासन दिले की त्याला सर्व सामने खेळण्याची संधी मिळेल.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
मनीष झा म्हणाले- आकाशने खूप टेनिस बॉल क्रिकेट खेळले आहे. त्याच्याकडे वेग होता, पण अचूकता नव्हती. तो टेनिस बॉल क्रिकेटप्रमाणे लेदर बॉलवर खूप प्रयोग करत असे. पण जर तुम्हाला वेगवान आणि सरळ गोलंदाजी करता येत असेल तर तुम्ही हळू किंवा मिक्सिंग का करत आहात? हा माझा सवाल होता. हळूहळू आकाशच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने ही गोष्ट सोडून दिली. मागील वर्षीच्या पांढऱ्या चेंडू क्रिकेटच्या काही सामन्यांसाठी आम्ही आकाशला उत्तराखंडचा कर्णधार म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादव जखमी झाल्यानंतर त्याचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला होता. आता तो रोहितचा प्रमुख गोलंदाज आहे.
आकाशने एका संधीसाठी चातकाप्रमाणे पाहिली वाट :
आकाश मधवालने आपली कहाणी माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानला सांगितली होती. तो म्हणाला होता, “मी तीन वर्षांपासून वाट पाहत होतो. आधी आरसीबीमध्ये नेट बॉलर होतो आणि नंतर मुंबई इंडियन्समध्ये सपोर्ट बॉलर झालो. मला मुंबईत संधी मिळाली तेव्हा माझे मन म्हणत होते की मला टीममध्ये खेळायचे आहे” असे आकाशने सांगितले होते. या वर्षीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आकाशला खेळणायची संधी आकाशला मिळाली नाही. आकाशच्या आधी अर्जुन तेंडुलकर आणि काही गोलंदाजांना संधी मिळाली. अखेरीस पंजाब किंग्जविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याला कोणतेही यश मिळाले नव्हते, त्याने त्या मॅचमध्ये 3 षटकात 37 धावा दिल्या होत्या.
ऋषभ पंतसोबत आकाशचे खास कनेक्शन :
धंदेरा, रुरकी येथील रहिवासी असलेल्या आकाशचे भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशी खास नाते आहे. आकाश हा पंतचा शेजारी आहे. पंतप्रमाणेच आकाशलाही अवतार सिंग यांनी प्रशिक्षण दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवतार यांनी सांगितले होते की, आकाशचे घर पंतच्या घरासमोर आहे. दिवंगत तारक सिन्हा सरांसोबत प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी ऋषभ माझ्या नेतृत्वात खेळला होता. पंतप्रमाणेच आकाशनेही आता उत्तराखंडमध्ये नाव मोठे केले आहे. आकाशने उत्तराखंड संघासाठी 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 विकेट तर 17 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 18 बळी घेतले आहेत. देशांतर्गत टी-20 आणि आयपीएलसह, आकाशने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 29 सामन्यांत 37 विकेट घेतल्या आहेत.
