Asia Cup 2025 Ind Vs Pak Super 4 Match On 21 September : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी झालेल्या ग्रुप-स्टेज सामन्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे हा सामना अधिकच गाजतो आहे. भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास टाळाटाळ केली होती. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाकिस्तानने तर स्पर्धा बहिष्काराची धमकी दिली होती, ज्यामुळे त्यांचा यूएईविरुद्धचा सामना उशिरा सुरू झाला होता.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी ग्रुप-ए मधून सुपर-4 मध्ये प्रवेश (Ind Vs Pak) मिळवला आहे. 21 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. भारताने गटातील दोन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांपैकी दोन जिंकले (Cricket) आणि एका सामन्यात पराभव पत्करला. परिणामी, पाकिस्तान चार गुणांसह दुसऱ्या स्थानी (Asia Cup 2025) राहिला.
भारतीय संघाने ग्रुप-स्टेज सामन्यात पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 127 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने प्रत्युत्तरात केवळ 15.5 षटकांत 3 गडी गमावत लक्ष्य सहज गाठले. त्यामुळे आगामी सामन्यातही भारताचेच पारडे जड मानले जात आहे.
दरम्यान, यूएई आणि ओमान या संघांचा प्रवास स्पर्धेत थांबला आहे. यूएईला फक्त एकच विजय मिळवता आला, तर ओमानने सलग दोन सामने गमावल्यामुळे तो सुपर-4 मध्ये पोहोचू शकला नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या थरारक लढतीकडे लागले आहे. यंदा सुपर-4 मध्ये दोन्ही संघांच्या या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय चाहते आणि क्रिकेटप्रेमी आतुरतेने 21 सप्टेंबरचा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सामन्यात कोण विजयी होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.