Virat Kohli And 23 Number Coincidence : चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. हा सामना जिंकण्यामध्ये विराट कोहलीचं (Virat Kohli) योगदान लाखमोलाचं आहे. पण आता भारतीय संघाने हा सामना जिंकल्यानंतर विराट कोहली, पाकिस्तान आणि 23 तारखी अशा एका वेगळ्याच योगायोगाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, नेमका हा प्रकार काय याबद्दल जाणून घेऊया…
विराट कोहली, पाकिस्तान आणि 23 तारीख जागतिक क्रिकेटमध्ये हा एक असा योगायोग आहे की, प्रत्येकवेळी या तारखेला काहीतरी मोठेच घडल्याची नोंद आहे. त्यामुळे आता 23 तारखेला विराट कोहलीचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू नक्कीच 10 वेळा विचार करतील.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, 23 तारखेला जेव्हा जेव्हा विराट कोहली आणि पाकिस्तानच्या संघातील खेळाडू समोरासमोर आले आहेत तेव्हा निकाल नेहमीच अतुलनीय राहिला आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये असो वा नसो, त्याने आपली जादू दाखवली आहे. एवढेच काय तर, यापूर्वी जेव्हा जेव्हा पाकिस्तानी संघाचा सामना भारतीय संघाशी झाला आहे तेव्हा तेव्हा पाकिस्तानी संघाला झालेल्या पराभवामुळे रडावे लागले आहे.
23 फेब्रुवारी 2025 रोजी झळकावले शतक
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 23 तारखेला विराट कोहलीने पाकिस्तानला कधी कधी ठोकून काढले आहे तर, आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये असे दोनदा घडले आहे. ज्याचे ताजे उदाहरण म्हणजे काल 23 फेब्रुवारी 2025 रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेला भारत-पाकिस्तान सामना होय.
दुबईच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी विराट कोहली ज्या फॉर्मसाठी ओळखला जातो त्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता. पण, पाकिस्तान समोर येताच जगाला खरा विराट कोहली दिसला. मग जे काही घडले ते सर्व क्रिकेटप्रेमींनी याचि देही याची डोळा अनुभवले यात काहीचं शंका नाही. 23 फेब्रुवारी 2025 रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या, ज्यामुळे तो आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. दुबईमध्ये विराटने झळकावलेले शतक हे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याचे पहिले शतक होते. यामुळे, तो 16 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा दुसरा सामनावीराचा किताब जिंकू शकला.
23 ऑक्टोबर 2022 रोजी नाबाद 82 धावांची खेळी
कालच्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावून भारताला विजय मिळवून देण्यापूर्वी, विराटने त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले होते. जेव्हा त्याने पहिल्यांदा हे केले तेव्हा मैदान होते ते मेलबर्नचे आणि सामना होता तो टी-20 विश्वचषकातील पण तारीख तीच होती 23 ऑक्टोबर 2022. या सामन्यात विराट कोहलीने 53 चेंडूंचा सामना करत नाबाद 82 धावा केल्या आणि संघाला विजयाकडे नेले. विराट कोहलीची ती खेळी त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते.
23 क्रमांकांचे ‘विराट’ कनेक्शन
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 23 ऑक्टोबर 2022 आणि 23 फेब्रुवारी 2025 या दोन्ही तारखांना रविवार होता. त्यामुळे 23 या क्रमांकाशी संबंधित योगायोग केवळ तारखांचा नाही, तर विराटचा जर्सी क्रमांक 18 आणि त्याच्या वाढदिवस 5 नोव्हेंबर रोजी आहे. या दोन्ही तारखा जोडल्यावर येणारा क्रमांक देखील 23 आहे.