IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत काल भारताने परंपरा राखत पाकिस्तानची धुळधाण उडवली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत पाकिस्तानला पाणी पाजलं. या सामन्याचा देशभरातून प्रचंड विरोध होत होता. कारण याला पहलगाम हल्ल्याच्या दुःखाची किनार होती. विरोध होत असताना देशभरात आंदोलने होत असतानाही हा सामना झाला आणि भारताच्या जिगरबाज खेळाडूंनी पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवला. मैदानावरचा सामना जसा जिंकला तसाच मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
या हायहोल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी (IND vs PAK) राखून विजय मिळवला. दुबईतील मैदानावर काल हा सामना (Asia Cup 2025) आयोजित करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 128 धावांचं आव्हान भारताला दिलं. भारतासाठी हे आव्हान सुरुवातीपासूनच सोपं होतं. फलंदाजांनी हे आव्हान लिलया पार केलं.
खरंतर या सामन्याचा देशभरात विरोध होत होता. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) हिंदू धर्मियांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात 26 निष्पाप हिंदूंचा मृत्यू झाला होता. या घटनेची प्रचंड चीड भारतीयांच्या मनात आहे. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानात हल्ले करून दहशतवादी अड्डे नष्ट केले होते. या घडामोडींनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये अशी देशवासियांची भावना होती. मात्र सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आशिया चषकात हा सामना टीम इंडियाला खेळता आला.
Ind Vs Pak : भारताने परंपरा राखली! 4 षटकं राखत पाकिस्तानवर दणदणीत विजय
बीसीसीआय आणि सरकारची परवानगी असली तरीही हा सामना होऊ नये, खेळाडूंनी या सामन्यावर बहिष्कार टाकावा (India vs Pakistan) अशी मागणी भारतीयांची होती. विरोधी पक्षांनी काल देशभरात आंदोलने केली. पाकिस्तानचे पुतळे जाळले. सोशल मीडियावर मोहिमा चालवण्यात आल्या. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. यात सर्वच विरोधी पक्ष आघाडीवर होते. जनतेच्याही मनात नाराजीची भावना होती. या घडामोडी पाहून खेळाडूही दडपणात आले होते. हा सामना खेळू नये अशीच त्यांची भावना होती. या संदर्भात कोच गौतम गंभीर, खेळाडू आणि व्यवस्थापनाची बैठक झाल्याचीही माहिती बाहेर आली होती.
खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं
तरीदेखील हा सामना झाला. या सामन्यात खेळाडूंनी मात्र देशवासियांच्या भावनांचा काही प्रमाणात का होईना आदर केला. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं. सामना सुरू होण्याआधी जेव्हा नाणेफेक झाली त्यावेळी देखील सूर्यकुमारने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही. यानंतर सामना जिंकल्यानंतरही मैदानात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच बाहेर पडले.
दरवाजाही बंद करून टाकला
यानंतर भारतीय खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करत गळाभेट घेत मैदान सोडले. भारतीय खेळाडूंची ही भूमिका पाहता पाकिस्तानी खेळाडूंनीही ड्रेसिंग रुमचा रस्ता धरला. यानंतर भारताच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये जात दरवाजाही बंद करून टाकला. या अनपेक्षित प्रकाराने पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच भांबावले होते.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..