Nitish Kumar Reddy : नीतीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा टीम इंडियासाठी (Nitish Kumar Reddy) संकटमोचक ठरला. नीतीशने मेलबर्न कसोटी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले आणि या सामन्यात भारतीय संघाचं दमदार (Team India) कमबॅक करवून दिलं. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये नीतीशने शतक ठोकताच क्रिकेट चाहत्यांचा आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतर आता नितीश कुमारच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नितीशचे वडील मुत्याला रेड्डी भारतीय क्रिकेटचे धुरंधर फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यावर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत.
Nitish Kumar Reddy’s family meet the great Sunil Gavaskar @abcsport #AUSvIND pic.twitter.com/hUBOghxM2e
— Ben Cameron (@BenCameron23) December 29, 2024
नीतीश रेड्डीने शतक केल्यानंतर स्वतः सुनीस गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी त्याच्या कुटुंबाला भेट दिली होती. यावेळी गावस्कर म्हणाले होते, नितीशच्या वडिलांचा संघर्ष मला माहिती आहे. त्यांना किती त्याग केला हे देखील मला माहिती आहे. तुमच्यामुळे मी सुद्धा रडत आहे. तुमच्यामुळे भारतीय क्रिकेटला आणखी एक हिरा मिळाला अशा शब्दांत सुनील गावस्करांनी नितीश कुटुंबाचं कौतुक केलं.
मेलबर्न येथील कसोटी सामना पाहण्यासाठी नितीशचे कुटुंबिय देखील हजर होते. नितीशनेही त्यांना नाराज केले नाही. शतक पूर्ण केल्यानंतर नितीशने ज्यावेळी बॅट उंचावली त्यावेळी त्याच्या वडिलांच्या डोळे पाण्याने डबडबले. लेकाच्या कामगिरीने त्यांचा उर भरून आला. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू हे आनंदाचे होते, अभिमानाचे होते, मुलाचं करिअर घडविण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाचे हे अश्रू होते. या अश्रूंचं मोल किती होतं हे त्यांना देखील चांगलंच ठाऊक होतं.
मुलाचं शतक अन् वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; अथक संघर्षाचं झालं चीज
मेलबर्न कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज मात्र ढेपाळले होते. संघाची स्थिती बिकट झाली होती. अशा परिस्थितीतून संघाला बाहेर काढून मजबूत स्थितीत घेऊन येण्याची गरज होती. एकवेळी तर 191 धावांत सहा बाद अशी स्थिती झाली होती. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी भारतीय संघ संघर्ष करत होता. पण, याच संकटाच्या काळात नीतीशने स्वतःला सिद्ध केलं.
खरंतर या सामन्यात त्याच्या निवडीवर प्रश्न विचारले जात होते. अनेत क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्या या निवडीवर प्रश्न विचारले होते. पण संकटाच्या काळातच माणसाची खरी परीक्षा असते. मग हा प्रसंग कोणताही असो. नीतीशने अशाच कठीण प्रसंगात मैदानावर तग धरून शानदार शतक झळकावले. संघाला सावरलेच शिवाय आपल्या टीकाकारांनाही चोख उत्तर दिले. वडिलांना या काळात जी टीका सहन करावी लागली. त्या सगळ्यांचीच बोलती बंद करण्याचं काम नीतीशने केलं.