New Zealand vs West Indies : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत शतक झळकावणारा फलंदाज डॅरिल मिशेल संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटकडून देण्यात आली आहे.
रविवारी हॅगली ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध (New Zealand vs West Indies) मिशेलने त्याचे सातवे एकदिवसीय शतक झळकावले. डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) सोमवारी संघासोबत नेपियरला गेला नाही आणि क्राइस्टचर्चमध्ये (Christchurch) त्याचे स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये कंबरेला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून आले आणि त्याला दोन आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे.
तर डॅरिल मिशेल 2 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेळेत बरा होईल. न्यूझीलंडसाठी ही चांगली बातमी आहे. कव्हर म्हणून बोलावण्यात आलेला कॅन्टरबरीचा फलंदाज हेन्री निकोल्स उर्वरित मालिकेसाठी संघासोबत राहील.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले की मिशेलसाठी ही बातमी निराशाजनक आहे. “दुखापतीमुळे मालिका सोडणे नेहमीच कठीण असते, विशेषतः जेव्हा तुम्ही डॅरिलसारख्या उत्तम फॉर्ममध्ये असता. त्याने या उन्हाळ्यात आतापर्यंत एकदिवसीय स्वरूपात अपवादात्मक कामगिरी केली आहे, त्यामुळे दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याची उणीव भासेल.
चांगली बातमी अशी आहे की दुखापत किरकोळ आहे आणि आपल्याला डॅरिल कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसेल.” वॉल्टर म्हणाले की निकोल्स हा संघासाठी एक मजबूत पर्याय आहे. मालिकेचा दुसरा सामना 19 नोव्हेंबर रोजी आणि तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकांना स्थगिती देणार, सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला इशारा
न्यूझीलंडचा संघ खालीलप्रमाणे
डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विल यंग, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), झाचेरी फॉल्क्स, काइल जेमीसन, मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर आणि मार्क चॅपमन.
