Doug Bracewell : काउंटी चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डग ब्रेसवेल असं या खेळाडूचं नाव असून कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी त्याची टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी चेम्सफोर्ड येथे सोमरसेट विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान त्याने कोकेन घेतल्याप्रकरणी करण्यात आलेली चाचणी पॉजिटिव्ह आल्याने या 35 वर्षीय खेळाडूवर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डग ब्रेसवेलवर बंदी
डग ब्रेसवेलने (Doug Bracewell) कबूल केले की, सामन्यादरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर (County Championship) आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी त्याने कोकेनचे सेवन केले होते. सप्टेंबर 2025 मध्ये टेस्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर, ब्रेसवेलने 28 डिसेंबर रोजी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्त झालेला असूनही, आता आयसीसीने ब्रेसवेलवर दोन वर्षांची बंदी लादली आहे.
आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या (New Zealand) डग ब्रेसवेलवर 24 नोव्हेंबर 2025 पासून बंदी लागू झाली आहे. यानुसार आता ही बंदी 23 नोव्हेंबर 2027 पर्यंत लागू राहणार आहे. डग ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी खेळाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 69 सामने खेळले आहेत. ब्रेसवेलने आपली चूक कबूल केली असून, तो दोन वर्षांची बंदी भोगण्यास तयार असल्याचे वृत्त आहे.
लपून छपून भेटणार नाही; उद्धव ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले
ब्रेसवेलवर यापूर्वीही बंदी
यापूर्वीही एकदा कोकेनच्या सेवनामुळे डग ब्रेसवेलवर अशाच अडचणीत सापडला होता. 2024 मध्ये, न्यूझीलंडमध्ये आयोजित ‘सुपर स्मॅश टी-20’ स्पर्धेदरम्यान, ब्रेसवेलची कोकेन सेवनाबाबतची टेस्ट पुन्हा एकदा पॉजिटिव्ह आली होती. त्यावेळी त्याच्यावर एका महिन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता मात्र, ब्रेसवेलवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
