Download App

T20 World Cup : विंडीजचा पहिला विजय! नवख्या पापुआ न्यू गिनी संघावर मात

रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजनेही कमाल दाखवत नवख्या पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव केला.

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली (T20 World Cup 2024) आहे. अमेरिकेने पहिल्याच सामन्यात कॅनडाचा पाडाव केला. त्यानंतर रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजनेही कमाल दाखवत नवख्या पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव केला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्टइंडिजने पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीने 137 धावांचे माफक लक्ष्य दिले होते. वेस्टइंडिज संघाने 19 ओव्हर्समध्येच विजय साकारला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीज संघाची सुरुवात खराब राहिली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्स बाद झाला. यानंतरही फलंदाज चाचपडत खेळताना दिसत होते. पहिली विकेट पडल्यानंतर निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग या दोघांनी संयमी खेळ केला आणि अर्धशतकीय भागीदारी केली. यानंतर पापुआ न्यू गिनीच्या ज़ॉन कॅरिकोने ही भागीदारी तोडली. त्याने निकोलस पूरना 27 धावांवर बाद केले.

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

यानंतर ब्रँडन किंगही 34 धावांवर खेळत असताना कर्णधार असद वालाच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. यानंतर विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल मैदानात उतरला. त्याने शेरफान रूदरफोर्ड बरोबर संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोमेरो शेफर्डने वेस्टइंडिजला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने सलामीचा फलंदाज टोनी उरा याला फक्त 2 धावांवर बाद केले. यानंतर संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. चार नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या सेसे बाउने एकट्याने संघर्ष केला. त्याने अर्धशतक केले. कर्णधार असद वालाने 21 तर चार्ल्स अमिनी याने 12 धावा केल्या.

सामन्याच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेटकीपर फलंदाज किपलिना डोरिगाने वेगाने फलंदाी करत 27 धावा केल्या. यामुळे संघाला वीस ओव्हर्समध्ये 136 धावा करता आल्या. वेस्टइंडिजकडून अल्झारी जोसेफने दोन तर रोमारिओ शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सोप्या धावांचा पाठलाग करण्यासाठीही वेस्टइंडिजच्या फलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. मात्र विंडीजने सामना जिंकून विजयी सलामी दिली.

T20 World Cup 2024 मध्ये टीम इंडियासाठी धोका ठरणार ‘हे’ तीन भारतीय खेळाडू

follow us