India beat England by 7 runs : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला आणि टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. 253 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार लढत दिली, मात्र अखेर भारताने 7 धावांनी हा सामना जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केला.
ही विश्वचषकाच्या नॉक-आऊट फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. संजू सॅमसन याने 42 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावांची तुफानी खेळी करत भारतीय डावाची धुरा सांभाळली. त्याला ईशान किशन याची चांगली साथ लाभली. किशनने 18 चेंडूत 39 धावा करत सॅमसनसोबत 45 चेंडूंमध्ये 97 धावांची भागीदारी केली.
यानंतर शिवम दुबे याने 25 चेंडूंमध्ये 43 धावा करत संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. हार्दिक पंड्या (27) आणि तिलक वर्मा (21) यानीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. या डावात भारताने तब्बल 19 षटकार ठोकत विश्वचषकातील एका डावातील संयुक्त सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला. तसेच सॅमसनने या स्पर्धेत एकूण 16 षटकार ठोकत रोहित शर्मा याचा विक्रमही मोडला. 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही दमदार सुरुवात केली. हार्दिक पंड्या याने सुरुवातीलाच फील सॉल्ट याला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने कर्णधार हॅरी ब्रुक याला माघारी पाठवले.
IND Vs ENG : सॅमसनची धुव्वादार खेळी; इंग्लंडसमोर ठेवलं 254 धावांचं लक्ष्य…
मात्र जेकॉब बेठेल याने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडकडून विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम केला. विल जॅकस याच्यासोबत त्याने 27 चेंडूत अर्धशतकी भागीदारी करत सामना रंगतदार केला. मात्र निर्णायक क्षणी अर्षदीप सिंह याने जॅक्सला बाद करत ही धोकादायक भागीदारी तोडली. शेवटच्या षटकांत इंग्लंडला मोठ्या धावांची गरज होती. कर्णधाराने राखून ठेवलेल्या जसप्रीत बुमराह यांच्या षटकांनी सामना भारताच्या बाजूने झुकवला.
१९व्या षटकात बेथेलने शतक पूर्ण केले. त्याने 48 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 7 षटकारांसह 105 धावांची शानदार खेळी केली. मात्र शेवटच्या षटकात दुसरी धाव घेताना तो धावबाद झाला आणि इंग्लंडचा विजयाचा मार्ग बंद झाला. अखेर इंग्लंडचा डाव 20 षटकांत 7 बाद 246 धावांवर थांबला आणि भारताने 8 धावांनी हा थरारक सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे.
