India-Pakistan to clash again in World Cup : क्रिकेट चाहत्यांनो, पुन्हा एकदा तयार व्हा एका थरारक महामुकाबल्यासाठी! टी20I आशिया कप 2025 नंतर आता कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे ICC T20I World Cup 2026 चे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडे असला, तरी राजकीय कारणांमुळे पाकिस्तान संघाला भारतात प्रवेश नसल्याने या बहुप्रतिक्षित सामन्याचे आयोजन सहयजमान श्रीलंकेत करण्यात आले आहे. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना कोलंबोतील R. Premadasa Stadium येथे रंगणार आहे.
रविवार, 15 फेब्रुवारी… संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल, तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडेल. वेळेत कोणताही बदल नाही, त्यामुळे चाहत्यांनी आपापली तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. कारण भारत-पाकिस्तान सामना म्हणजे फक्त क्रिकेट नाही, तर तो भावना, प्रतिष्ठा आणि करोडो चाहत्यांच्या अपेक्षांचा संग्राम असतो.
या वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही आपले पहिले दोन सामने जिंकले असून ते अजिंक्य आहेत. त्यामुळे सलग तिसरा विजय कोण मिळवणार? कोणाचा विजयाचा रथ पुढे सरकणार? याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
विलिनीकरणासाठी घाई करायचे कारण का ? छगन भुजबळांचे शरद पवार गटाच्या नेत्यांना सवाल
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच डीडी फ्री डिशवरील डीडी स्पोर्ट्सवरही हा सामना उपलब्ध असेल. मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर जिओहॉटस्टार अॅपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग करता येईल. प्रत्येक चेंडू, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेटसोबत चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.
तर मग सज्ज व्हा… कारण रविवारी रंगणार आहे क्रिकेटचा महासंग्राम. अजिंक्य भारत विरुद्ध अजिंक्य पाकिस्तान कोण मारणार बाजी? याचे उत्तर मिळेल 15 फेब्रुवारीला म्हणजेच आज रात्री, आर. प्रेमदासा स्टेडियमच्या मैदानावर!
