भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सर्वांगीण कामगिरी करत ९० धावांनी शानदार विजय मिळवला. (T20) या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताची ही पहिली मालिका विजय ठरली, तर दमदार फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हरारे येथे झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत २० षटकांत ५ बाद २१९ धावांचा भक्कम डोंगर उभारला.
भारताकडून ईशान किशनने ४४ चेंडूत ८१ धावांची झंझावाती खेळी करत डावाचा कणा सांभाळला. त्याने शतकाच्या दिशेने वाटचाल केली होती, मात्र ८१ धावांवर त्याची खेळी संपली. तिलक वर्माने केवळ २९ चेंडूत नाबाद ६० धावा करत अखेरपर्यंत तुफानी फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने ९ चेंडूत २० धावा, श्रेयस अय्यरने २५, रिंकू सिंहने १२, तर शिवम दुबेने नाबाद ६ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्मा अवघ्या ८ धावांवर बाद झाला.
२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात समाधानकारक झाली. मात्र ब्रायन बेनेट बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. झिम्बाब्वेचा संपूर्ण डाव १७.५ षटकांत १२९ धावांत आटोपला. ब्रायन बेनेटने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली.
भारताच्या गोलंदाजांमध्ये अभिषेक शर्माने २.५ षटकांत १७ धावा देत ३ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने २, प्रिन्स यादवने दुखापत होण्यापूर्वी २, तर शिवम दुबे, तिलक वर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेत झिम्बाब्वेचा डाव गुंडाळला. मयंक यादवला मात्र या सामन्यात विकेट मिळाली नाही.
या विजयामुळे भारताने मालिका २-० अशी जिंकली असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरीची नोंद केली आहे. आता मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचे लक्ष्य झिम्बाब्वेवर निर्भेळ वर्चस्व राखत मालिका ३-० अशी जिंकण्याचे असेल.
