नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (IND vs AUS 2nd Test) सध्याच्या या कसोटी मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. (IND vs AUS) नागपुरात खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने कांगारूं संघाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) अतिशय महत्वाची कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.
आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना देखील जाडेजा गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आहे, या सामन्यातील पहिला विकेट घेताच त्यानं इतिहास रचला आहे. रवींद्र जाडेजाने सामन्यात पहिली विकेट घेताच २५० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या अगोदर त्याने २ हजार ५०० धावांचा विक्रम देखील ओलांडल्याने अप्रतिम अष्टपैलू खेळी करणारा तो पहिला भारतीय तर जगातील दुसराच क्रिकेटर ठरला आहे. या कामगिरीने सर्वत्र त्याचं कौतुक होत असून बीसीसीआय यांनी देखील खास पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलं.
Milestone 🚨 – @imjadeja becomes the fastest Indian and second fastest in world cricket to 250 Test wickets and 2500 Test runs 🫡🫡#INDvAUS pic.twitter.com/FjpuOuFbOK
— BCCI (@BCCI) February 17, 2023
सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू
टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळे आपल्या कसोटी कारकिर्दीत ६१९ विकेट घेण्यात यशस्वी ठरलेला खेळाडू होता. शिवाय आर अश्विन ४६०, कपिल देव ४३४, हरभजन सिंग ४७१, इशांत शर्मा ३११, झहीर खान ३११, बिशन सिंग बेदी २६६ आणि रवींद्र जाडेजाने २५२ विकेट घेतले आहेत.
जाडेजाची कसोटी कारकिर्द
रवींद्र जाडेजाने २०१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण केलं होते. गेल्या १० वर्षांत तो टीम इंडियाचा मोठा भाग होता. जाडेजाने आतापर्यंत ६१ कसोटी सामने खेळला आहे. या ६१ सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी करताना २ हजार ५९३ धावा करण्याबरोबरच २५२ विकेट्स घेण्यात त्याला यश आले आहे. कसोटी सामन्यात त्याच्या नावावर ३ शतकं आणि १८ अर्धशतकांचा रेकार्ड करण्यात तो यशस्वी खेळाडू ठरला आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद १७५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तर दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ४८ धावांत ७ बळी मिळवणे ही आहे.