India vs Pakistan Head To Head Matches : या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाईल. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण भारतीय चाहते ज्या सामन्याची वाट पाहत होते त्या सामन्याची तारीख समोर आली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला महामुकाबला खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेपॉक येथे होणार आहे. विश्वचषकाची उपांत्य फेरीचे सामने मुंबईत खेळवली जाऊ शकतात.
या संघांमधील पहिला सामना
रिपोर्टनुसार, वनडे वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो. या दिवशी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होऊ शकतो. 2019 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनाही या संघांमध्ये खेळला गेला होता. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. वर्ल्ड कप 2023 चा निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होऊ शकतो. अहवालानुसार, आयसीसीने आगामी विश्वचषकाचे वेळापत्रक तयार केले आहे. भारतात चालू असलेल्या IPL 2023 च्या समाप्तीनंतर विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.
या मैदानात रंगणार हा महामुकाबला
पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येण्यास होकार दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी पीसीबीने म्हटले होते की, जर भारत आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानला आला नाही तर ते वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होऊ शकतो, असा दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र, आता पाकिस्तानने अहमदाबादमध्ये खेळण्यास आक्षेप घेतल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत हा सामना अन्य ठिकाणी हलवला जाऊ शकतो. अहवालानुसार, पाकिस्तान आपले सामने हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू येथे खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या आठ संघांनी मिळाले स्थान
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये विजेतेपदासाठी 10 संघांमध्ये लढत होणार आहे. यासाठी 8 संघांनी जागा निश्चित केली आहे. पात्रता फेरी खेळल्यानंतर आणखी दोन संघ येतील. स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ सुमारे 9-9 सामने खेळेल. यजमान भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका WC साठी पात्र ठरले आहेत. झिम्बाब्वेमध्ये 18 जून ते 9 जुलै या कालावधीत पात्रता फेरीसाठी सामने खेळवले जातील.