भारताचा पाकिस्तानवर पुन्हा दणदणीत विजय; हॉकी वर्ल्डकपमध्ये 16 वर्षांचा दबदबा कायम!

सामना हातातून निसटत असल्याचे दिसत असतानाही पाकिस्तानने अखेरच्या टप्प्यात पुन्हा जोरदार प्रयत्न केले.

News Photo   2026 08 19T213306.508

भारताचा पाकिस्तानवर पुन्हा दणदणीत विजय; हॉकी वर्ल्डकपमध्ये 16 वर्षांचा दबदबा कायम!

हॉकी वर्ल्डकप 2026 मध्ये भारताने पारंपरिक (World Cup) प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. रंगतदार आणि चुरशीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत क्रॉसओव्हर फेरीत दिमाखात प्रवेश केला. या विजयासह वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 2010 पासून सुरू असलेली भारताची विजयी मालिका कायम राहिली. तब्बल 16 वर्षांनंतरही पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. पाचव्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने अप्रतिम फटका मारत भारताचे खाते उघडले. त्यानंतर 11व्या मिनिटाला मनदीप सिंगने संधीचा अचूक फायदा घेत भारताची आघाडी 2-0 अशी केली. पहिल्या क्वॉर्टरअखेर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही भारताचा वेग कायम राहिला. 21व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र, पाकिस्तानने हार मानली नाही. सुफियान खानने दोन गोल करत सामन्यात रंगत आणली. दरम्यान, अभिषेकने शानदार ड्रिब्लिंगनंतर मैदानी गोल करत भारताला पुन्हा दोन गोलची आघाडी मिळवून दिली.

गॉलमध्ये भारताचा जलवा!श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा, WTC फायनलच्या दिशेने दमदार पाऊल

दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला. भारताला काही काळ दहा खेळाडूंसह खेळावे लागले, मात्र भारतीय बचावफळीने पाकिस्तानच्या आक्रमणाला रोखून धरले. याच दरम्यान भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हार्दिक सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत भारताची आघाडी 5-2 अशी केली.

सामना हातातून निसटत असल्याचे दिसत असतानाही पाकिस्तानने अखेरच्या टप्प्यात पुन्हा जोरदार प्रयत्न केले. भारताकडून झालेल्या चेंडूवरील चुकीचा फायदा घेत शाहिदने पाकिस्तानचा तिसरा गोल नोंदवला. त्यामुळे सामन्यातील अंतर 5-3 वर आले. अखेरच्या मिनिटांमध्ये पाकिस्तानने दबाव वाढवला, मात्र भारतीय बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

अखेर भारताने 5-3 असा शानदार विजय मिळवत क्रॉसओव्हर फेरी गाठली. दुसरीकडे, या पराभवासह पाकिस्तानचे हॉकी वर्ल्डकप 2026 मधील आव्हान संपुष्टात आले. भारत-पाकिस्तान सामन्यातील पारंपरिक थरार कायम असला, तरी यंदाही विजयाचा तिरंगा भारतानेच फडकवला.

Exit mobile version