गॉलमध्ये भारताचा जलवा!श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा, WTC फायनलच्या दिशेने दमदार पाऊल
धनंजय बाद झाल्यानंतर सोनल दिनुषाने झुंज कायम ठेवली. त्याने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
गॉलच्या मैदानावर भारताने दमदार कामगिरी (Sri Lanka) करत श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय फिरकीसमोर श्रीलंकेचा डाव 206 धावांवर आटोपला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 462 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 284 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात तब्बल 178 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात मात्र भारतीय फलंदाजांना फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फिरकीला अनुकूल परिस्थितीत भारताचा डाव 193 धावांवर संपला. पहिल्या डावातील आघाडी धरून भारताने श्रीलंकेसमोर 372 धावांचे लक्ष्य ठेवले.
Hockey World Cup : भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने पराभव
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातच अडखळली. निशान मदुष्का, लहिरू उदारा, कामिंदु मेंडिस आणि पासिंदू सूरियबंदारा हे आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र, पाचव्या दिवशी कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी भारताच्या गोलंदाजांचा संयमाने सामना केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या. अखेर रवींद्र जडेजाने धनंजयला 59 धावांवर बाद करत ही भागीदारी फोडली.
धनंजय बाद झाल्यानंतर सोनल दिनुषाने झुंज कायम ठेवली. त्याने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, त्याची विकेट गेल्यानंतर श्रीलंकेचा डाव झपाट्याने कोसळला. निरोशन डिकवेला 10, केशारा नुवांथा २०, प्रभात जयसूर्या आणि लाहिरू कुमारा यांनी खातेही उघडता आले नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने 165 धावांनी सामना खिशात घातला.
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फिरकीपटू मानव सुथार. त्याने 23.4 षटकांत अवघ्या 55 धावा देत श्रीलंकेचे तब्बल सहा फलंदाज माघारी धाडले. प्रसिद्ध कृष्णाने दोन, तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयामुळे भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयी टक्केवारी वाढली असून, आता मालिकेतील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचे भारताचे लक्ष्य असेल. हा विजय मिळाल्यास अंतिम फेरीच्या शर्यतीत भारताची मोहीम आणखी मजबूत होणार आहे.