India VS Sri Lanka : लंकेच्या फिरकीसमोर भारताची हाराकिरी; वेंडरने टॉपच्या फलंदाजांना गुंडाळले !
India VS Sri Lanka 2nd Odi: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोरदार झटका बसलाय. लंकेने भारताला 208 धावांवर बाद करत सामना 32 धावांनी जिंकलाय. लंकेने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु लेग स्पिनर जेफरी वेंडरसमोर पाच फलंदाज बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडेच मोडून टाकले. पहिला सामनाही बरोबरीत सुटला होता. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतलीय.
श्रीलंकेने (Sri Lanka ) प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अविष्का फर्नांडो (40 धावा) आणि कामिंदू मेंडिसने (40 धावा) शानदार फलंदाजी करत लंकेला 50 षटकांत 240 धावांपर्यंत नेले. भारताकडून (India) वाशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 10 षटकांत 30 धावा देत तीन बळी घेतले. तर कुलदीप यादवने दोन फलंदाज बाद केले. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक-एक फलंगाज बाद केला. लंकेने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीला निर्णय घेतला. हा निर्णय मोहम्मद सिराजने चुकीचा ठरविला. सिराजने पहिल्याच चेंडूवर पाथूम निसांकाला बाद केले. त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसने दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी लंकेला धक्कावर धक्के दिले. शेवटी दुनिथ वेलालागे ( 39 धावा) आणि कामिंदू मेंडिसने चांगली खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
जेफरीसमोर रोहित, गिल, कोहलीने नांग्या टाकल्या
श्रीलंकेचा लेग स्पिनर जेफरी वेंडरसमोर भारतीय गोलंदाजांनी अक्षरशाः नांग्या टाकल्या. रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांनाही त्याच्यासमोर संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा (64) आणि शुभमन गिलने (35) स्फोटक सुरुवात केली होती. या जोडीने 97 धावांची भागिदारी केली. हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत असताना जेफरीने रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, शुवम दुबेला बाद केले. अवघ्या 26 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले. श्रेयस अय्यरला त्याने बाद केले. 133 धावांवर भारताचा अर्धासंघ बाद झाला होता. त्यानंतर अक्षर पटेल आणि वाशिंग्टन सुंदर यांनी चांगली फलंदाजी केली. पण दोघांनाही असलंकाने बाद केले. 190 धावांवर भारताचे 8 गडी बाद झाले होते.