Download App

IPL 2023 : IPL गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना प्रेक्षक विसरले

Top 5 Indian IPL Player :  भारतीय क्रिकेट रसिकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. क्रिकेट रसिक ज्याची वर्षभर वाट पाहत असतात तो क्षण उद्यावर येऊन ठेपला आहे. उद्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला अनेक नामवंत खेळाडू मिळाले आहेत. पण या स्पर्धेत सामना गाजवलेले काही खेळाडू हे प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंविषयी सांगणार आहोत ज्यांनी एकेकाळी  आयपीएलचे मैदान गाजवले पण आता प्रेक्षक त्यांना विसरले आहेत.

13 एप्रिल 2011च्या  दिवशी आयपीएलच्या महामुकाबल्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकले होते. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या टीमने 188 धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाबचा संघ पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध आपला पहिला सामना हरला होता. त्यामुळे हा सामना जिंकणे पंजाबसाठी महत्वाचे होते.

या सामन्यात पंजाबचे प्रतिनिधीत्व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज अॅडम गिलक्रिस्ट करत होता. हा सामना जिंकण्यासाठी गिलक्रिस्टने एक मोठा डाव खेळला. त्याने या सामन्यात ओपनिंगसाठी नियमित ओपनर करणाऱ्या शॉन मार्शच्याऐवजी पॉल वल्थाटीला ओपनिंगसाठी पाठवले आणि यानंतर जे झाले ते क्रिकेटचे फॅन्स कधीही विसरु शकणार नाही. वल्थाटीने चेन्नईच्या गोलंदाजीचा अक्षरश: धुव्वा उडवला व शतक ठोकले. एका रात्रीत वल्थाटी स्टार बनला. पण यानंतर वल्थाटीचे काय झाले हे कुणालाच माहित नाही.

भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय

पॉल वल्थाटी ( किंग्स इलेवन पंजाब )

यामध्ये पहिले नाव आहे अर्थातच पॉल वल्थाटी याचे. ज्याचा उल्लेख आम्ही सुरुवातीला केला आहे. 2011 साली त्याने पंजाबकडून खेळताना जोरादर शतक ठोकले. त्याने केवळ 63 बॉल्समध्ये 120 रन्स ठोकले. त्याने चेन्नईच्या सर्व गोलंदाजांना पाणी पाजले. वल्थाटी त्याच्या या खेळीमुळे रात्रीतून स्टार झाला. त्या सीजनमध्ये वल्थाटीने 14 सामन्यांमध्ये 137 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकाचा समावेश होता. यानंतर वल्थाटी कायम दुखापतग्रस्त रहायला लागला. आयपीएलच्या 2012 सालच्या सीजनमध्ये त्याने सहा सामने खेळले होते तर 2013 साली फक्त 1 सामना खेळला होता. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सध्या तो एअर इंडियामध्ये काम करत आहे व मुंबईमध्ये क्लब क्रिकेट खेळत आहे.

स्वप्निल असनोडकर ( राजस्थान रॉयल्स )

या यादीमध्ये दुसरे नाव आहे ते गोव्याच्या स्वप्निल असनोडकर याचे. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये राजस्थानच्या टीमने हा किताब पटकावला होता. यामध्ये शेन वॉर्न, शेन वॉटसन व युसूफ पठाण हा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली होती. या व्यतिरिक्त आणखी एका खेळाडूने संपूर्ण सीजनमध्ये सर्वांना प्रभावित केले होते तो म्हणजे स्वप्निल असनोडकर होय. त्याने 2008 सालच्या आयपीएलमध्ये एकुण 9 सामने खेळले होते व त्यात 311 रन्स केले होते. यानंतर मात्र तो आपला फार प्रभाव दाखवू शकला नाही व त्याचे आयपीएल करिअर संपूष्टात आले.

कामरान खान ( राजस्थान रॉयल्स )

अशाच एका खेळाडूने आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते. त्याचे नाव कामरान खान. त्याने 2009 साली राजस्थाच्या संघाकडून आपला आयपीएलचा डेब्यू केला. ते देखील कोणतीही फर्स्ट क्लास मॅच न खेळता. शेन वॉर्नने त्याला ‘टॉरनेडो’ असे नाव दिले होते. या सीजनमध्ये तो केकेआरच्या विरुद्ध सुपर ओवर टाकून चर्चेत आला होता. यावेळी त्याने ख्रिस गेलची देखील विकेट काढली होती. त्याच्या स्लिंग आर्म बॉलिंग अॅक्शनला देखील लोकांनी पसंती दिली होती. पण त्याची अॅक्शनच त्याच्यासाठी अडचण झाली. नंतर त्याला रिहॅब सेंटरमध्ये जाऊन त्याच्या अॅक्शनमध्ये सुधार करावा लागला. परंतु याचा परिणाम त्याच्या बॉलिंगवर झाला व यामुळे त्याचे सर्व करिअर संपूष्टात आले. त्याने 11 आयपीएल सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.

 

IPL 2023 : IPLच्या दिमाखदार सोहळ्यात दिसणार दिग्गज अभिनेत्रींचा जलवा

राहुल शर्मा ( पुणे वॉरियर्स )

आता या यादीमध्ये नाव आहे ते भारतीय संघासाठी खेळलेल्या राहुल शर्मा याचे. त्याने आयपीएल 2011च्या सीजनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. या सीजनमध्ये त्याने पुणे वॉरियर्सकडून खेळताना 16 विकेट घेतल्या होत्या. यावेळी त्याने चक्क सचिन तेंडूलकरला बोल्ड केले होते. त्यामुळे त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा झाली होती. त्याच्या प्रदर्शनामुळे त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील संधी मिळाली होती. त्याने भारतासाठी 4 वनडे व 2 टी-20 सामने खेळले आहेत. यानंतर 2012 साली एका रेव पार्टीमध्ये त्याचे नाव आल्यावर त्याचे करिअर संपूष्टात आले.

यो महेश ( दिल्ली डेअरडेविल्स )

या यादीत शेवटचे नाव आहे ते यो महेश याचे. त्याने आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्येच आपली छाप सोडली होती. यावेळी त्याने 11 सामन्यांमध्ये एकुण 16 विकेट घेतल्या होत्या. यानंतर मात्र त्याच्या परफॉर्मन्समध्ये कमी आल्याने त्याच्या आयपीएल करिअरवर ब्रेक लागला.

Tags

follow us