IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश स्टार सलामीवीर जोस बटलरला गुरुवारी रात्री ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे.
केकेआरविरुद्ध जोस बटलर शून्यावर धावबाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसाठी विकेटचे बलिदान दिले होते. मात्र, जयस्वालने राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. केवळ 13 चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या जैस्वालने नाबाद 98 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.
मात्र, अशाप्रकारे धावबाद झाल्याने बटलरची चांगलीच निराशा झाली आणि पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने आपली बॅट बाऊंड्री लाईनवर आदळली. याच कारणामुळे बीसीसीआयने बटलरला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे.
आयपीएलने रात्री उशिरा निवेदन जारी केले
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मध्यरात्री एका निवेदनात माहिती दिली, “इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या 56व्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. उल्लंघन केल्यामुळे मॅच फीच्या 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे.”
निवेदनात म्हटले आहे की बटलरने IPL आचारसंहितेच्या कलम 2.2’f अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा स्वीकारला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी, सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. बटलरने देखील आपली चूक मान्य केली आहे.
राजस्थानने हा सामना सहज जिंकला
IPL 2023 च्या 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम खेळून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने केवळ 13.1 षटकांतच लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या.त्याने 13 चौकार आणि 5 षटकार लगावले. कर्णधार संजू सॅमसन 48 धावांवर नाबाद परतला.