MI vs RCB : आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. 9 मे (मंगळवार) रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला 200 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमानांनी 17 व्या षटकात पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, त्याने 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यादरम्यान सूर्याने सात चौकार आणि सहा षटकार मारले.
या विजयासह मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मुंबईचा हा 11 सामन्यातील सहावा विजय ठरला. दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी आता एका स्थानाने घसरल्यानंतर सातव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. इशान किशनने अवघ्या 21 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 42 धावा केल्या. आपल्या झंझावाती खेळीदरम्यान इशानने रोहित शर्मासोबत 51 धावांची भागीदारी केली. 5 व्या षटकात वानिंदू हसरंगाने इशानला यष्टिरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. हसरंगाने त्याच षटकात रोहितलाही एलबीडब्ल्यू केले, त्याला केवळ सात धावा करता आल्या.
दोन विकेट पडल्यानंतर सूर्य कुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी अशी फलंदाजी केली, ज्यामुळे आरसीबीचे होश उडाले. दोन्ही खेळाडूंनी षटकार आणि चौकारांची बरसात करताना विरोधी संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्या आणि वढेरा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 64 चेंडूत 140 धावांची भागीदारी झाली. नेहल वढेरानेही 34 चेंडूंचा सामना करत नाबाद 52 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
नाणेफेक हारल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्याची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पाचव्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला (1 धाव) यष्टिरक्षक इशान किशनकडे झेलबाद केले. यानंतर त्याच्या पुढच्या षटकात या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने अनुज रावतलाही चालायला लावले. 6 धावा करणाऱ्या रावतने कॅमेरून ग्रीनकडे कॅच सोपवला.
मॅक्सवेल-डू प्लेसिसने तुफानी खेळी खेळली
16 धावांत दोन विकेट पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी 120 धावांची धडाकेबाज भागीदारी करून आरसीबीचा डाव सावरला. मॅक्सवेलने 33 चेंडूत 68 धावांची खेळी केली, ज्यात आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. जेसन बेहरेनडॉर्फने मॅक्सवेलला नेहल वढेराकडे झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर काही वेळातच महिपाल लोमरोर (1) आणि फाफ डू प्लेसिसही पॅव्हेलियनमध्ये परतले.
डु प्लेसिसने 41 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. डु प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकने काही जोरदार फटके मारून आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. कार्तिकने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या. वनिंदू हसरंगा आणि केदार जाधव या दोघांनी 12 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.