IND vs NZ : चौथ्या दिवशी सरफराज खान आणि ऋषभ पंतच्या संघर्षपूर्ण फलंदाजीने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आशेचे किरण पेटवले होते. मात्र, न्यूझीलंडच्या नव्या चेंडूंच्या हल्ल्याने त्या प्रयत्नांवर अक्षरशः बुलडोझर फिरवला. भारताचे 7 फलंदाज अवघ्या 54 धावांत ढेपाळल्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयाचा आलिंगन घालण्यासाठी अवघ्या 107 धावांची गरज होती. चौथ्या दिवशी केलेला संघर्ष पाचव्या दिवशीही अनुभवायला मिळेल. गोलंदाज चमत्कार करतील, अशी आशा होती. पण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात सहज सामना जिंकला. तब्बल 36 वर्षांनंतर भारताला मायभूमीत हरवण्याचा पराक्रम न्यूझीलंडला करता आला सध्या भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला आहे.
न्यूझीलंडचा पराक्रम! पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव; कमबॅकचे प्रयत्न अपयशी
सरफराज खान आणि ऋषभ पंतने शनिवारी कसोटीच्या चौथ्या दिवशी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागी रचून भारतीय संघाच्या मनात विजयाची आशा निर्माण केली होती, पण 81 व्या षटकांत घेतलेल्या नव्या चेंडूने भारतीय फलंदाजांच्या पोटात अक्षरशः गोळा आणला. कसोटीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नव्या चेंडूने हाणून पाडला. सरफराज-पंतनंतर नव्या चेंडूचा हल्ला इतका घातक होता की, भारताची मधली फळी अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि भारताचे विजयाचं स्वप्न हवेतच विरून गेलं.
रचिनने संधीच दिली नाही
न्यूझीलंडला 107 धावांचे माफक लक्ष्य गाठायचे होते. खेळावर पावसाचे सावट होते, पण पाऊण तास उशिराने सामना सुरू होणार असल्याचे कळताच न्यूझीलंडने सुटकेचा निःश्वास सोडला. फलंदाजीला येताच न्यूझीलंड भारताच्या गोलंदाजीवर तुटून पडत वेगात धावा करणार, याची कल्पना होती. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांना धडाधड विकेट काढण्यावाचून पर्याय नव्हता. जसप्रीत बुमराने दिवसाच्या दुसर्याच चेंडूवर कर्णधार टॉम लॅथमची विकेट काढत सनसनाटी निर्माण केली. शून्यावरच पहिली विकेट मिळाल्यामुळे भारतीय गोलंदाजांमध्ये चैतन्य संचारले होतं.
थरारक सामन्यात विंडीजचा पराभव, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक; दक्षिण आफ्रिकेला भिडणार
त्यानंतर बुमराने काही भन्नाट चेंडू टाकले तरी पहिल्या डावात 91 धावांची खेळी करणाऱ्या डेव्हन कॉन्वेने विल यंगसह तासाभर किल्ला लढवला. तेव्हा बुमराने कॉन्वेला बाद करून आणखी एक यश मिळवलं. पण त्यानंतर विल यंग आणि रचिन रवींद्रने बुमरा-सिराजच्या माऱ्याला सहज थोपवत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांनंतर आपल्या तिन्ही फिरकीवीरांनाही आणले, पण यंग-रवींद्रने भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी निर्माण करूच दिली. यंग 48 तर रचिन 39 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात 134 धावांची तडाखेबंद खेळी करणारा रचिन रवींद्र ‘सामनावीर’ ठरला.
36 वर्षे आणि 19 कसोटी
अखेर न्यूझीलंड भारतात तब्बल 19 कसोटी आणि 36 वर्षांनंतर भारतीय संघाला हरविण्याची किमया साधली. बरोबर 36 वर्षे आणि एक महिन्यापूर्वी वानखेडेवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 136 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंड तब्बल 19 कसोटी खेळले, पण त्यांना एकाही कसोटीत भारतीय संघाला नमवता आलं नव्हतं. यात ते 10 कसोटी हरले तर 9 कसोटी अनिर्णितावस्थेत राहिल्या होत्या. एवढेच नव्हे तर 2010 ते 2016 दरम्यान सलग सहा कसोटी सामन्यांत भारताकडून त्यांना दारुण पराभवांची झळही सोसावी लागली होती. अखेर ती मालिका खंडित करण्यात त्यांना साडेतीन दशकांनंतर यश लाभले.