T20 World Cup 2026 : टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेतून बाहेर होणारा ओमान पहिला संघ ठरला आहे. आज झालेल्या ग्रुप बी च्या सामन्यात आयर्लंडने शानदार कामगिरी करत ओमानचा 96 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने पाच बाद 235 धावा केल्या. आयर्लंडकडून कर्णधार टकरने दहा चौकार आणि चार षटकारांसह 94 धावा नाबाद ठोकले.
कर्णधार टकरच्या या कामगिरीच्या जोरावर आयर्लंडने टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) ची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. प्रत्युत्तरात ओमानचा (Oman) संघ 18 षटकांत 139 धावांत गारद झाला. ओमानकडून आमिर कलीमने 50 आणि हमाद मिर्झा यांनी 46 धावा केल्या. ओमानचे आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. आयर्लंडकडून (Ireland) जोश लिटलने (Josh Little) चार षटकांत 16 धावांत तीन विकेकट घेतले. मॅथ्यू हम्फ्रीज आणि बॅरी मॅकार्थी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. या विजयानंतर आयर्लंड ग्रुप बीमध्ये चौथ्या स्थानावर पोहचला आहे. तर या ग्रुपमध्ये श्रीलंका पहिल्या, झिम्बाब्वे दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता सुपर 8 साठी कोणते दोन संघ पात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाणेफेक जिंकून ओमानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 38 वर्षीय शकीलने तीन षटकांत तीन विकेट घेत आयर्लंडला बॅकफूटवर आणले होते मात्र त्यानंतर टकरने एका टोकाला धरून आयर्लंडचा डाव स्थिरावला. आयर्लंडच्या कर्णधाराने त्याच्या डावात दहा चौकार आणि चार षटकार मारले. त्याने जेरेथ डेलानी (56) सोबत 56 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने जॉर्ज डॉकरेल (35) सोबत 19 चेंडूत 70 धावा जोडल्या. डॉकरेलने त्याच्या नऊ चेंडूंच्या डावात पाच षटकार मारले. शेवटच्या चार षटकांत आयर्लंडने 86 धावा केल्या.
