कोलकाता : विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानच्या (Pakistan) संघाने अधिकृतपणे गाशा गुंडाळला आहे. न्यूझीलंडला (New Zealand) मागे टाकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ईडन-गार्डनवरील मॅचमध्ये इंग्लंडने दिलेले आव्हान पाकिस्तानला आवश्यक ओव्हर्समध्ये पूर्ण करणे अशक्य आहे. इंग्लंडचे 300+ धावांचे आव्हान पाकिस्तानला अवघ्या 7 ओव्हर्समध्ये पूर्ण करायचे आहे. पण हेच आव्हान अशक्य असल्याने पाकिस्तानचे अधिकृतरित्या पॅकअप झाले आहे. (Pakistan team is officially out of the World Cup 2023)
त्याचवेळी पुण्यात सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिय-बांग्लादेश मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत तिसरे स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये पॉईंट टेबल पहिल्या स्थानी असलेल्या भारतापुढे चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. 2019 मधील विश्वचषकामध्येही भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगला होता. त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर यंदाच्या विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताने न्यझीलंडवर सहज विजय मिळविला. पण आता फायनल गाठायची असल्यास भारताला हा प्रराक्रम पुन्हा करावा लागणार आहे.
सेमीफायनल गाठण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी न्यझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस रंगली होती. मात्र श्रीलंकेवरील विजयामुळे न्यूझीलंड गुणतालिकेत पुढे गेला. सध्या न्यूझीलंडचा रनरेट +0.743 आहे. तर पाकिस्तानचा +0.036 इतका नेट रनरेट होता. या रनरेटमधून न्यूझीलंडच्या पुढे जात चौथे स्थान पटकिवण्यासाठी पाकिस्तानला चमत्कारिक विजयाची आवश्यकता होती.
यातही जर पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग केली असती तर काही समीकरणे पाकिस्तानच्या बाजूने होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानला 400 धावा करण्याची आणि इंग्लंडला 112 धावांत रोखण्याची कामगिरी करावी लागणार होती. हे समीकरण प्राथमिकदृष्ट्या पाकिस्तानच्या बाजूने होते. पण दुसऱ्या बॅटिंग करतानाचे एकही समीकरण पाकिस्तानच्या बाजूने नव्हते. इंग्लंडचे 300+ धावांचे आव्हान पाकिस्तानला अवघ्या 7 ओव्हर्समध्ये पूर्ण करायचे आव्हान दुसऱ्यांदा बॅटिंग करतानाचे होते.
अशात इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडच्या ओपनर्सनी वादळी सुरुवात केली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनीही चांगली बॅटिंग करत धावांचा डोंगर उभारला. त्यामुळेच ज्यावेळी पाकिस्तानने टॉस हारला त्याचवेळी पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला होता.
सामन्याआधी मोईन खान आणि शोएब मलिकसह पाकिस्तानच्या माजी कर्णधारांनी बाबर आझम कर्णधारपदावर उघडपणानं टीका केली होती. त्यावर टीव्हीवर बसून मत मांडणं सर्वांना सोपं वाटतं, असं म्हणत त्याने टीकाकारांना फटकारलं होतं. कर्णधारपदाच्या दबावाचा बाबर आझमच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचं या माजी कर्णधारांचं मत आहे. टीकेवर बाबर म्हणाला, टीव्हीवर आपलं मतं देणं खूप सोपं आहे. जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी मला थेट फोन करावा, त्यांचं स्वागत आहे, माझा नंबर सर्वांना माहीत आहे, असंही यावेळी बाबर म्हणाला.