Paris Olympics 2024 : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ नावाचा चित्रपट आहे. हा चित्रपट १९४८ मधील लंडन ऑलिम्पिक (London Olympics) स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या (Indian Hockey) गोल्ड मेडल जिंकण्याच्या प्रवासावर आधारित आहे. या संघात नव्या खेळाडूंचा भरणा होता. त्यांच्याकडे अनुभव नव्हता. तरी देखील भारताच्या शिलेदारांनी जिगरबाज खेळ केला आणि ब्रिटिश खेळाडूंना त्यांच्याच देशात धूळ चारली. आताच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही (Paris Olympics) हॉकी संघाने दमदार खेळ केला. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड यांसारख्या संघांचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये मात्र जर्मनीने भारताचा (IND vs GER) विजय रथ रोखला. फायनल खेळून सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यानिमित्ताने भारतीय हॉकी संघानं पहिलं गोल्ड मेडल कधी पटकावलं याची माहिती घेऊ या..
१२ ऑगस्ट १९४८ हा तो दिवस होता ज्यावेळी भारतीय हॉकी संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन करत ब्रिटनला पराभवाची धूळ चारली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी ही स्पर्धा झाली होती त्यामुळे भारतीय खेळाडू ब्रिटन विरुद्ध अतिशय त्वेषाने खेळले आणि विजय मिळवला. याआधी पारतंत्र्यात असतानाही भारतीय संघाने जिगरबाज खेळ करत तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्यानंतर सलग चौथ्या वेळेस ब्रिटनला मात देण्याचा पराक्रम भारताने केला होता.
१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली होती. या बरोबरच हॉकी संघाचीही फाळणी झाली. संघातील काही खेळाडू पाकिस्तान संघात (Pakistan) गेले होते. याआधी १९३६ मधील बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सगळे खेळाडू एकाच संघात सहभागी होते. १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात नव्या खेळाडूंचा भरणा होता. ज्यांच्याकडे अनुभवही नव्हता.
मोठी बातमी! बांग्लादेशातील व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद; भारताचा मोठा निर्णय
सुरुवातीला हॉकी संघात पंजाबमधील खेळाडूंचा भरणा असायचा. पण १९४८ मधील ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेल्या संघात आठ खेळाडू मुंबईचे (तेव्हाचे बॉम्बे) होते. संघाचे कर्णधार किशन लाल सुद्धा मुंबईचे होते. उत्तर प्रदेशचे खेळाडू केडी सिंह बाबू यांना तर हुकुमी एक्का मानले जात होते. १९४८ मधील हॉकी संघात किशन लाल (कर्णधार), लेस्ली कॉडीयस, केशव दत्त, वॉल्टर डिसुझा, रंगनाथन फ्रान्सिस, गॅरी ग्लॅकन, लॉरी फर्नांडिस, अख्तर हुसैन, पॅट्रिक जॉन्सन, लियो पिंटो, जसवंत सिंह राजपूत, अमीर कुमार, लतिफ उर रहमान, बलबीर सिंह सिनियर, रणधीर सिंह जेंटल, रेजिनाल्ड रोड्रिक्स, ग्रहनंदन सिंह, केडी सिंह बाबू, त्रिलोचन सिंह आणि मक्सी वाज या खेळाडूंचा समावेश होता.
त्यावेळी इंडीयन हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष नवल टाटा होते. टीममध्ये एकसंघपणा येण्यासाठी त्यांनी खेळाडूंना अनेक सराव सामने खेळण्याचा सल्ला दिला. तसेच मुंबईत कँपशी हॉकी टीमला जोडले. या तयारीमुळे भारतीय संघाला लंडनला पोहोचण्यासाठी उशीर होऊ लागला. अन्य देशांचे संघ लंडनला पोहोचले होते. भारतीय संघाला मात्र उशीर झाला होता. जुन्या पद्धतीने जर संघाला लंडनला रवाना केलं असतं तर आणखी उशीर झाला असता. कारण मेजर ध्यानचंद यांच्या काळात भारतीय संघ समुद्र मार्गे ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात होता.
अशा अडचणीच्या काळात पुन्हा एकदा नवल टाटा पुढे आले. त्यांनी संघाची अडचण जाणली होती. त्यांनी सगळ्या संघाला विमानाने पाठवण्याची व्यवस्था केली होती. यासाठीचा अतिरिक्त खर्च त्यांनी स्वतः उचलला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय संघ कमी वेळात लंडनला पोहोचला होता. ही खास आठवण यानिमित्ताने आल्याशिवाय राहत नाही.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघ अ गटात होता. या गटात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, स्पेन, ऑस्ट्रिया यांसारखे बलाढ्य संघ होते. भारताचा पहिला सामना ग्रास ग्राऊंडवर (गवताचे मैदान) झाला. या मैदानावर खेळणे कठीण असते. परंतु या परिस्थितीचा भारतावर परिणाम झाला नाही आणि भारताने हा सामना ८-० अशा फरकाने जिंकला. यानंतर अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यातही भारताने चमकदार खेळ करत सामना ९-१ अशा फरकाने जिंकला. पुढील सामन्यात भारताने स्पेनचा २-० अशा फरकाने पराभव केला. तीन सामने जिंकून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये नेदरलँड्स विरुद्ध टक्कर देण्यास सज्ज झाली. या सामन्यात २-१ अशा फरकाने विजय मिळवला.
चाललंय काय..! कुस्तीपटू अंतिम पंघालही अडचणीत; तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश
आता भारतापुढे एक नवे संकट उभे राहिले होते. लंडन मध्ये पाऊस सुरू झाला होता. पावसाने संपूर्ण मैदान ओले झाले होते. भारतीय खेळाडू वेगात खेळत होते पण ओल्या मैदानावर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नव्हता. युरोपीय संघाना या परिस्थितीचा अनुभव होता. दुसरी अडचण म्हणजे आधीच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या बलबीर सिंह यांना या सामन्यात संधी मिळाली नव्हती. या निर्णयामुळे लंडनमधील भारतीय नाराज झाले आणि त्यांनी भारतीय हाय कमिश्नर व्हीके कृष्ण मेनन यांची भेट घेतली. बलबीर सिंह यांना संघात घ्या अशी मागणी या युवकांनी केली. या युवकांचे प्रयत्न म्हणा किंवा टीमची गरज म्हणा बलबीर सिंह यांना पुन्हा संधी मिळाली.
बलबीर सिंह यांना संघात घेतल्याचा फायदाच झाला. मैदान ओले असतानाही त्यांनी महत्त्वाच्या वेळी दोन गोल केले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने ब्रिटन संघाचा ४-० अशा फरकाने पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. यानंतर पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा भारताने दोन गोल्ड मेडलची कमाई केली होती.
लंडन ऑलिम्पिक मध्ये भारत आणि ब्रिटन (India vs Britain) यांच्यातील अंतिम सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहण्यास मिळाली. पाकिस्तानचा संघ बाहेर पडला होता. या नंतरही पाकिस्तानी खेळाडूंनी भारताला पाठिंबा दिला होता. सामन्यावेळी सर्व पाकिस्तानी खेळाडू स्टेडियम मध्ये हजर राहिले होते.