Download App

पृथ्वी शॉचा मुंबईला बाय बाय.. आता ‘या’ राज्याकडून मिळाली मोठी जबाबदारी

पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाची माहिती दिली.

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ काही (Prithvi Shaw) वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पृथ्वीने जुलै 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरोधात (IND vs SL) खेळला होता. त्यानंतर मात्र त्याला पुन्हा भारतीय संघात (Team India) संधी मिळाली नाही. आता पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या तयारीत व्यस्त आहे. पुढील हंगामात तो मुंबईकडून खेळताना दिसणार नाही. त्याच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोमवारी प्रेसनोट प्रसिद्ध करुन या निर्णयाची माहिती दिली.

पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट टीमचा भाग बनला आहे. ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी यांसारखे स्टार खेळाडू महाराष्ट्राच्या संघात आहेत. आता या संघात पृथ्वीची एन्ट्री झाल्याने संघाची ताकद वाढली आहे.

याबाबत पृथ्वी म्हणाला,की माझ्या करिअरचा विचार करता हा निर्णय माझ्यासाठी सकारात्मक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मी कायम आभारी राहिल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलीकडच्या वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिकेटच्या विकासात चांगलं काम केलं आहे. मी ऋतुराज गायकवाड, अंकित बावने, राहुल त्रिपाठी यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळणे माझ्यासाठी उत्साहवर्धक राहणार आहे.

विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, पृथ्वी शॉ सारखे खेळाडू आमच्या संघात येत आहेत ही आमच्या अभिमानाची बाब आहे. यामुळे आमच्या टीमला अधिक बळकटी मिळणार आहे. त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी महत्वाचा ठरेल. या नव्या प्रवासासाठी आम्ही पृथ्वी शॉला शुभेच्छा देत आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलीकडच्या काही वर्षांत एमपीएल (महाराष्ट्र प्रीमियर लीग), वुमेन्स एमपीएल आणि डीबी देवधर टूर्नामेंट्सच्या माध्यमांतून राज्यात क्रिकेटची पातळी आणखी उंचावली आहे.

follow us