नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल अगोदरच (WTC Final 2023) भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दुरावला आहे. यामुळे संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देखील आगामी आयपीएल (IPL) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अहमदाबाद कसोटीच्या दरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठीला मोठी दुखापत झाली होती. आता डॉक्टरांनी त्याला सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस सध्या मुंबईमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तिसऱ्या तपासणीनंतर डॉक्टरांनी श्रेयसला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. म्हणजेच अय्यर जवळपास ५ महिने बॅटपासून दूर राहणार आहे.
IPL ला देखील मुकणार
तसेच आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामाला देखील अय्यर गैरहजर राहणार असलायची माहिती मिळाली. शिवाय ७ जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यासाठी देखील अय्यर नसणार आहे. यामुळे हा भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला लंडनमध्ये सर्जरी करायची आहे. पण ऑपरेशनसाठी ठिकाण किंवा हॉस्पिटल अद्याप बीसीसीआयने सांगितलं नाही. खरं तर इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते १२ जून यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे.