Download App

रोहितच्या करिअरला ब्रेक लावणारे 188 दिवस; सहा महिन्यांत नेमकं काय घडलं?

रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे.

Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydeny Test) सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब फॉर्ममुळे त्याला बाहेर बसावं लागलं आहे. यामुळे आता रोहितचं टेस्ट करिअर (Rohit Sharma) संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. म्हणजेच मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे. मागील वर्षातील जून महिन्यात रोहितच्याच नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 विश्वचषकावर (Team India) नाव कोरलं होतं.

188 दिवसांत रोहितच्या करिअरला उतरती कळा

भारतीय क्रिकेट संघात असे थोडेच कर्णधार होऊन गेले ज्यांनी आयसीसी विजेतेपद मिळवलं. यामध्ये रोहित शर्माचंही नाव आहे. ज्यावेळी त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळी रोहित हिरो ठरला होता. सगळीकडे त्याचीच वाहवा होत होती. पण यानंतर त्याचं नशीब असं काही पालटलं की आता फक्त सहा महिन्यानंतर त्याला संघाच्या बाहेर व्हावं लागलं आहे. या विश्वचषकानंतर ना रोहितची बॅट चालली ना त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने मोठी बाजी मारली. याच कारणामुळे कर्णधार असतानाही रोहितला संघाच्या बाहेर करण्यात आलं आहे.

रोहित-गंभीरमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियाला झालंय तरी काय, 2019 नंतर पुन्हा फूट..

टी 20 वर्ल्डकपनंतर रोहितची बॅट शांत

जून 2024 मधील टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानातून काही काळ विश्रांती घेतली होती. श्रीलंका दौऱ्याच्या वेळी तो पुन्हा संघात परतला होता. या मालिकेतील तीन सामन्यात रोहितने 52.33 च्या सरासरीने 157 रन केले होते. यानंतर भारतीय संघाचा कसोटी सिझन सुरू झाला. पण प्रत्येक सामन्यात रोहित फ्लॉप ठरला. या काळात रोहितने बांगलादेश विरुद्ध 2, न्यूझीलंड विरुद्ध 3 आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 कसोटी सामने खेळले. पण या दरम्यान त्याला फक्त एकदाच 50 रन करता आले.

फक्त फलंदाजीच नाही तर कप्तानीतही रोहित अपयशी ठरला. बांगलादेश विरुद्धचे दोन कसोटी सामने सोडले तर रोहितच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्डकपनंतर त्याने एकही कसोटी जिंकली नाही. मागील सहा कसोटी सामन्यात एकही सामना जिंकता आला नाही फक्त एक सामना ड्रॉ करता आला.

न्युझीलंडने तर भारतात येऊन तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाला पाणी पाजलं होतं. भारतासाठी हा मालिका पराभव अतिशय लाजिरवाणा होता. यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला. पण, या सामन्यात रोहित नव्हता. रोहित आल्यानंतर मात्र भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. या घडामोडी नंतरच रोहितला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

follow us