IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने (GT) 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋद्धिमान साहाने 54 आणि साई सुदर्शनने गुजरातकडून 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने 2 तर दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी पहिली 2 षटके सावधपणे खेळताना केवळ 8 धावा केल्या.
यानंतर तिसऱ्या षटकात दोघांनी मिळून धावांचा वेग वाढवला आणि धावसंख्या थेट 24 धावांपर्यंत नेली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी 32 चेंडूत पूर्ण झाली. पहिल्या 6 षटकांअखेर गुजरातने कोणतेही नुकसान न करता 62 धावा केल्या होत्या.
बॅंकेतील 38 लाख आणि 12 तोळे सोन्यावर तरुणीचा डल्ला; प्रियकरासोबत पोबारा
गुजरातला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 67 धावांवर बसला. रवींद्र जडेजाने गिलला 39 धावांवर यष्टिचित करताना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर ऋद्धिमान साहाला साई सुदर्शनची साथ मिळाली. दोघांनी मिळून रनरेट अजिबात कमी होऊ दिला नाही. गुजरात संघाने 10 षटकांत 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या.
या महत्त्वाच्या सामन्यात वृद्धीमान साहाने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 131 धावांवर गुजरातला साहाच्या रूपाने दुसरा धक्का बसला. जो 39 चेंडूत 54 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 मोठ्या घोषणा, अजूनही अपूर्ण
गुजरात संघाने डावाच्या 17व्या षटकात 20 धावा केल्या. यानंतर संघाने 18व्या षटकात 9 धावा केल्या, तर 19व्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने एकूण 18 धावा केल्या. गुजरातने डावाच्या शेवटच्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि एकूण 14 धावा केल्या आणि त्यांचा डाव 4 गडी गमावून 214 धावांवर संपला.
साई सुदर्शनने 96 तर हार्दिक पांड्याने 21 धावा केल्या. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 81 धावांची जलद भागीदारी पाहायला मिळाली. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 2 तर रवींद्र जडेजा आणि दीपक चहरने 1-1 बळी घेतला.