भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे पोलाद कारखाना सुरू करणार आहे. स्पेनमधील माद्रिदमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्याने स्वतः ही घोषणा केली. (Saurabh Ganguly to set up steel plant at Salboni in Paschim Medinipur, West Bengal.)
क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवल्यानंतर काही काळापासून सौरभ गांगुली राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. या दरम्यान, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची निवडणूक लढवत अध्यक्षपदही भूषविले. त्यानंतर आता गांगुलाने व्यवसाय क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे.
सध्या गांगुली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत स्पेनमध्ये असून तिथूनच त्यांने ही घोषणा केली. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही माद्रिदहून त्यांच्या फेसबुक पेजवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सौरभ गांगुली सध्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत स्पेन आणि दुबईच्या 12 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी माद्रिदमधील बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS) ला संबोधित करताना तो म्हणाला की, मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, कारण पाच ते सहा महिन्यांनंतर आम्ही मेदिनीपूरमध्ये आमचा नवीन स्टील प्लांट पूर्ण करत आहोत. येत्या एक वर्षात हा प्लांट कार्यान्वित होईल अशी पूर्ण आशा आहे.
गांगुलीची कारकीर्द अतिशय नेत्रदीपक राहिली आहे. त्याने 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान, त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये कसोटीत एका द्विशतकाचा समावेश आहे, ज्यामुळे त्याने या फॉरमॅटमध्ये 7212 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 22 शतके आणि 72 अर्धशतकांसह 11363 धावा केल्या.