फायनलआधी टीम इंडिया संकटात? ‘हा’ खेळाडू तातडीने श्रीलंकेला रवाना
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला असला तरी संघाने (Asia Cup 2023) फायनलचं तिकीट आधीच पक्कं केलं आहे. उद्या (रविवार) भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला तातडीने कोलंबोला दाखल होण्यास सांगितले आहे. या कॉलनंतर सुंदर कोलंबोला रवाना झाला आहे.
सुंदरला इतक्या तातडीने बोलावून घेण्याचं कारणही समोर आलं आहे. अक्षर पटेल कदाचित अंतिम सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. जर त्याने माघार घेतली तर त्याच्या जागी सुंदरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होऊ शकते. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या भारत बांग्लादेश सामन्यात अक्षरला दुखापत झाली होती. त्याला नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु, खबरदारी म्हणून सुंदरला तातडीने श्रीलंकेला बोलावण्यात आले आहे. सुंदर फायनल सामना खेळेल अशी शक्यता दिसत आहे. सुंदर हा ऑफब्रेक गोलंदाजी करतो तसेच तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. त्यामुळे अक्षर पटेल जर या सामन्यात खेळला नाही तर त्याची उणीव सुंदर भरून काढेल.
सुंदर याआधी जानेवारी 2023 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलँडविरुद्धच्या मालिकेत तो संघात होता. बीसीसीआयने विश्वकप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली त्यात मात्र वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली नाही.
दरम्यान, याआधी शुक्रवारी आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला 259 धावांवर रोखले आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. परंतु गिल बाद झाल्यानंतर सामना बांगलादेशच्या बाजूने झुकला. अक्षर पटेल याने फटकेबाजी करून 44 धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि षटकार मारले आहेत.