Ajinkya Rahane Announces Retirement From International Cricket : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकवून देणारा भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकेकाळी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा एक भक्कम आधारस्तंभ असलेला रहाणे बऱ्याच काळापासून भारतीय संघातून अनुपस्थित होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. ‘पुढे जाण्याची’ हीच योग्य वेळ असल्याचे सांगत रहाणेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 पासून सुरू केलेल्या आपल्या कारकिर्दीत रहाणेने भारतासाठी एकूण 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र, 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध परदेशात झालेल्या कसोटी मालिकेनंतर तो भारतासाठी खेळलेला नाही.
Senior India batter Ajinkya Rahane retires from international cricket, says time is right to move on
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2026
मी नेहमीच सच्चेपणाने खेळलो
‘मी देशासाठी सर्वतोपरी योगदान दिलं. मी नेहमीच सच्चेपणाने खेळलो. भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पर्वाचा मला भाग होता आलं याचा आनंद आणि समाधान आहे. मी खेळणं थांबवत असलो तरी खेळाप्रति योगदान देतच राहीन. मुंबई क्रिकेटने मला घडवलं. माझे आईबाबा, पत्नी आणि मुलं सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. मी ही वाटचाल करू शकलो कारण तुमचं प्रेम’, हे बोलताना अजिंक्य गहिवरला. ‘तुम्ही कधीच परकं मानलं नाहीत, सदैव साथ दिलीत’, सांगताना अजिंक्यला अश्रू आवरले नाहीत. भारतीय संघाचा माजी कर्णधार, मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्यने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संपूर्ण कारकीर्द
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करत रहाणेने ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून दिली. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मालिकेत भारताचे कर्णधारपद भूषवत 36 धावांत सर्वबाद झाल्यानंतरही संघाला मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय पदार्पण
T20I पदार्पण : 31 ऑगस्ट 2011 विरुद्ध इंग्लंड
ODI पदार्पण : 3 सप्टेंबर 2011 विरुद्ध इंग्लंड
कसोटी पदार्पण : 22 मार्च 2013 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
प्रमुख कामगिरी
– भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक.
– मेलबर्न कसोटीत (2020) कर्णधार म्हणून शानदार शतक झळकावत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
– लॉर्ड्स, मेलबर्न, जोहान्सबर्ग, वेलिंग्टन आणि किंग्स्टनसारख्या परदेशी मैदानांवर महत्त्वपूर्ण शतके.
– उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक म्हणूनही मोठे योगदान.
रहाणेच्या धावांचा डोंगर
कसोटी- 85 सामने, 5,077 धावा, 12 शतके आणि 26 अर्धशतके, 188 सर्वोच्च धावसंख्या
वनडे – 90 सामने, 2,962 धावा, 3 शतके आणि 24 अर्धशतके, 111 सर्वोच्च धावसंख्या
टी-20 – 20 सामने, 375 धावा, 1 अर्धशतके, 61 सर्वोच्च धावसंख्या
