एशियन गेम्स 2026 मधील महिला (Women Cricket) क्रिकेटच्या उपांत्य सामन्यात शेफाली वर्मानं बांगलादेशविरुद्ध वादळी शतक झळकावत भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. शेफालीनं अवघ्या 49 चेंडूंत नाबाद 100 धावा करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तिच्या खेळीत 3 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
शेफालीच्या या शतकामुळे भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी झाली. तिनं 49 चेंडूंत शतक पूर्ण केलं असून यापूर्वी हरमनप्रीत कौरनंही 49 चेंडूंत शतक झळकावलं होतं. याशिवाय एशियन गेम्सच्या महिला क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी शेफाली पहिली खेळाडू ठरली.
या खेळीदरम्यान शेफालीनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2026 या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. तिच्या नावावर यावर्षी 35 षटकार झाले असून तिनं श्रीलंकेची चमारी अटापट्टू हिचा 2024 मधील 32 षटकारांचा विक्रम मागं टाकला. तिच्या 9 षटकारांमुळे एका डावात सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाशीही तिची बरोबरी झाली.
भारताच्या डावात स्मृती मंधानानंही महत्त्वाचा विक्रम केला. बांगलादेशविरुद्ध 19 चेंडूंत 37 धावा करताना ती महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. मंधानाच्या नावावर आता 4,788 धावा असून तिनं न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागं टाकलं.
भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 15.4 षटकांत 81 धावांवर आटोपला आणि भारतानं 114 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर श्री चरणीनं 2 विकेट मिळवल्या. या विजयासह भारतानं अंतिम फेरी गाठली असून 22 सप्टेंबरला सुवर्णपदकासाठी भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
