Shahid Afridi On ICC : टी20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशने माघार घेतल्याने या प्रकरणावरुन आता पाकिस्तानी खेळाडू आयसीसीवर हल्लाबोल करताना दिसत आहे. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात टी20 विश्वचषकाचे सामने खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जेव्हा भारताने सुरक्षेच्या कारणास्तव 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला तेव्हा आयसीसीने भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची व्यवस्था केली. मात्र बांगलादेशच्या बाबतीत आयसीसी समजूतदारपणा दाखवण्यास तयार नाही असं शाहिद आफ्रिदीने एक्सवर म्हटले आहे. तसेच आयसीसीने संघाचा विचार न करता नियम सर्वांसाठी समान रीतीने लागू करावे असं अशी देखील मागणी आफ्रिदीने केली आहे.
न्याय्य वागणूक आणि निष्पक्षता ही जागतिक क्रिकेट प्रशासनाचा पाया आहे. बांगलादेशचे खेळाडू आणि त्याचे लाखो चाहते आदरास पात्र आहेत – दुहेरी मानके नाही. आयसीसीने संबंध निर्माण करावेत, त्यांना नुकसान पोहोचवू नये असं देखील आफ्रिदी म्हणाला.
तर दुसरीकडे टी20 विश्वचषक 2026 साठी बांगलादेशची मागणी मान्य न केल्याने पाकिस्तानने देखील या स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी आयसीसीला दिली आहे. आतापर्यंत पाकिस्तानने या विश्वचषक 2026 साठी संघाची घोषणा देखील केलेली नाही. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशची मागणी रद्द केल्याने पाकिस्तान काय निर्णय घेणार याकडे जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
