ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला शुबमन गिलच्या नेतृत्वातील पराभूत व्हावं लागलं आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने तब्बल 5 वेळा खोडा घातला. त्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवण्यात आला. भारताने 9 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार विजयासाठी 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाने यासह या मालिकेत विजयी सलामी देत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तसेच ऑस्ट्रेलियाचा हा पर्थमधील पहिलावहिला एकदिवसीय विजय ठरला. भारताच्या डावात 5 वेळा खोडा घालणारा पाऊस दुसर्या डावात आलाच नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी समसमान परिस्थिती नव्हती. त्यामुळे पावसाने टीम इंडियावर अन्याय केल्याचं म्हटलं जात आहे.
केएल-अक्षरची निर्णायक खेळी, भारताच्या 136 धावा, मात्र ऑस्ट्रेलियाला 131 रन्सचं टार्गेट
मार्श आणि जोश फिलीप या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. फिलीप 29 बॉलमध्ये 37 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर मार्श आणि मॅट रॅनशो या जोडीने चौथ्या विकेटसाठी नॉट आऊट 32 रन्सची पार्टनरशीप करत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. मार्शने 46 रन्स केल्या. तर रेनशॉ याने 21 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशाजनक कामगिरी केली. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दोघांनी निराशा केली. रोहितने 8 धावा केल्या. विराटला भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन म्हणून पहिला सामना खेळणारा शुबमन गिल याने 10 धावा केल्या. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर याने 11 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र तिथून केएल राहुल आणि अक्षर पटेल या जोडीने निर्णायक योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी याने महत्त्वपूर्ण खेळी केली.