Devon Thomas Banned For 5 Years : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू (T20 World Cup) होण्याआधीच वेस्टइंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्टइंडिज संघातील अनुभवी खेळाडू डेवोन थॉमसला झटका (Devon Thomas) देत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच वर्षांची बंदी घातली. थॉमसवर श्रीलंका क्रिकेट, अमिरात क्रिकेट बोर्ड आणि कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 7 अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या या कारवाईने वेस्टइंडिज क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
डेवोन थॉमसला याआधी मे 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या सात आरोपांसह निलंबित करण्यात आले होते. या आरोपांत एक आरोप मॅच फिक्सिंगचाही होता. थॉमसवर लावण्यात आलेल्या सात आरोपांपैकी चार आरोप श्रीलंका क्रिकेट भ्रष्टाचार विरोधी संहितेचे, दोन आरोप कॅरेबियन प्रीमियर लीग संहितेचे तर एक आरोप अमिरात क्रिकेट बोर्ड संहितेचा होता. हे सर्व आरोप थॉमसने मान्य केले आहेत.
या कारणामुळेच आयसीसीने थॉमसवर कठोर कारवाई करत त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. या शिक्षेच्या कालावधीची सुरुवात मे 2023 पासून सुरू झाली आहे. 2023 मध्ये आयसीसीने म्हटले होते की थॉमसवर लंका प्रीमियर लीग, अबू धाबी टी 10 आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना त्याच्या वर्तणुकीसंदर्भात आरोप करण्यात आले होते.
यातील सर्वात गंभीर आरोप 2021 मधील लंका प्रीमियर लीग दरम्यान मॅच फिक्सिंगच्या प्रयत्नाचा होता. थॉमसने या लीगमध्ये कँडी वॉरियर्ससाठी फक्त एक सामना खेळला होता. यासंदर्भात त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता.
डेवोन थॉमसने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत जास्तीत जास्त मर्यादित ओव्हर्सचेच सामने खेळले आहेत. 2009 पासून 2022 पर्यंतच्याड आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये थॉमसने एक कसोटी सामना, 21 वनडे सामने आणि 12 टी 20 सामने खेळले आहेत. या व्यतिरिक्त त्याने जगातील अनेक टी 20 क्रिकेट लीगमध्ये भाग घेतला आहे. थॉमसने त्याचा अखेरचा सामना मार्च 2023 मध्ये लीवर्ड आयलँडकडून खेळल होता.