T20 World Cup 2024 : गतविजेत्या इंग्लंड संघाने रविवारी अमेरिकन संघावर १० विकेट व ६२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला आणि टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिकसह टिपलेले चार फलंदाज आणि कर्णधार जॉस बटलरच्या घणाघाती नाबाद ९० धावांच्या खेळीच्या जोरावर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. या विजयामुळे आता दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यामधील लढतीच्या निकालानंतर गट दोनमध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा देश ठरणार आहे. (T20 World Cup) अमेरिकन संघाकडून इंग्लंडसमोर ११६ धावांचे आव्हान ठेवण्यात आलं. (T20) उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडला हे आव्हान १८.४ षटकांत पूर्ण करावयाचं होतं. जॉस बटलर व फिल सॉल्ट या सलामी जोडीने अमेरिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
जॉर्डनची हॅट्ट्रिक ऑस्ट्रेलियाचा वैरी अन् T20 मधला मास्टर; अफगाणिस्तानच्या विजयाचे मैदानाबाहेरचे हिरो
याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अमेरिकेचा डाव पाच बाद ८८ या धावसंख्येवरून ११५ धावांवर आटोपला. अखेरचा पाच फलंदाज त्यांनी सहा चेंडूंमध्ये गमावले. ख्रिस जॉर्डन याने अली खान, एन. केनजिगे व सौरभ नेत्रावळकर यांना सलगच्या चेंडूंवर बाद करीत हॅट्ट्रिक साजरी केली. जॉर्डनने १० धावा देत चार फलंदाज बाद केले. अदिल रशीद व सॅम करन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
वेस्ट इंडीजला मोठ्या विजयाची गरज
इंग्लंडने गट दोनमधून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे आता दक्षिण आफ्रिका – वेस्ट इंडीज यांच्यामधील एकच संघ या गटातून उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. याच दोन देशांमध्ये आज लढत रंगणार आहे. वेस्ट इंडीजने आतापर्यंत दोन गुणांची कमाई केली असून दक्षिण आफ्रिकन संघाने चार गुण कमवले आहेत. वेस्ट इंडीज संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघाला मोठ्या फरकाने पराभव टाळावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचा संघ या गटात अव्वल राहील. या वेळी वेस्ट इंडीजच्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल.
अमेरिका – १८.५ षटकांत सर्व बाद ११५ धावा (नितीशकुमार ३०, कोरे अँडरसन २९, ख्रिस जॉर्डन ४/१०, अदिल रशीद २/१३) पराभूत वि. इंग्लंड – ९.४ षटकांत बिनबाद ११७ धावा (जॉस बटलर नाबाद ८३ – ३८ चेंडू, सहा चौकार, सात षटकार, फिल सॉल्ट नाबाद २५).