Parag Patil Olympian : भारतासाठी दोन सुवर्ण. 11 रौप्य आणि 3 कांस्यपदकं जिंकून देशाचा मान अनेक पटींनी वाढविणारे पराग पाटील. क्रीडा विश्वातील मोठं नाव पण काळाच्या ओघात म्हणा की काळच बिकट झाला म्हणा आज मुंबईच्या रस्त्यावर ओला कार चालवत आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पराग पाटील यांच्यासमोर आर्थिक अडचणी अशा उभ्या राहिल्या की त्यांच्या करिअरला ब्रेक लागला आणि त्यांना ओला चालक म्हणून काम करणं भाग पडलं. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गर्दीत हरवलेला हा हिरा शोधून काढण्याचं काम केलंय युवा उद्योजक आर्यसिंह कुशवाहाने.
आर्यसिंग कुशवाहाने ही माहिती त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट केली. पराग पाटील यांच्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन केलं आणि लोकांनाही खास आवाहन केलं. त्याच्या या आवाहनाला लोक कसा प्रतिसाद देतील हा भाग नंतरचा पण प्रतिभावंत खेळाडूच्या वाट्याचं जीवनही यानिमित्ताने पुढं आलं आहे.
कुशवाहाने त्याच्या लिंक्डइन अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटलंय की माझा ओला चालक ऑलिम्पियन आहे. पराग पाटील ज्येष्ठ ऑलिम्पियन. पराग पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व केलं. दोन सुवर्ण, 11 रौप्य आणि 3 कांस्यपदकं त्यांनी जिंकली आहेत. तिहेरी उडीत आशियात दुसरा क्रमांक. उंच उडीत आशियात तिसरा क्रमांक. जेव्हा केव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व केलं. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी पदक मिळवलंच. त्यांनी दोन सुवर्ण, 11 रौप्य आणि 3 कांस्यपदकं पटकावली आहेत.
परंतु, आज त्यांच्याकडे कोणतेही आर्थिक साधन नाही. त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. म्हणून त्यांना त्यांच्या करिअरवर पाणी सोडावं लागलं. अशा कठीण काळात जे कुणी पराग पाटील यांना मदत करू शकतील त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. जेणेकरून पराग पुन्हा भारताचं प्रतिनिधीत्व करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला विजयी करतील.
नीरज चोप्राची भन्नाट कामगिरी! बेस्ट थ्रो करत मोडलं पॅरिस ऑलिम्पिक्समधलं रेकॉर्ड
आर्यसिंह कुशवाहाच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय की आपल्याकडे अनेक प्रतिभा व्यवस्थापन एजन्सी आहेत. पण क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी अशा यंत्रणा दिसत नाहीत हीच खरी समस्या आहे असं वाटतं. आपल्या क्रीडा क्षेत्रात अनेक दिग्गज आहेत. फक्त त्यांना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे असेही एका युजरने म्हटलं आहे.