मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) 17 व्या साखळी सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने गुजरात जायंट्सचा (Gujrat giants vs UP Warriors) 3 गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफसाठी त्यांचे स्थान निश्चित केले. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी संघाने 39 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांनी चौथ्या विकेटसाठी केवळ 53 चेंडूत 78 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
जेव्हा यूपी वॉरियर्स संघाला 117 धावांवर ताहलिया मॅकग्राच्या रूपात चौथा धक्का बसला, त्यानंतर ग्रेस हॅरिसने संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि धावांचा वेग पूर्णपणे राखण्याचे काम केले. यानंतर ग्रेस हॅरिस 41 चेंडूत 72 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतली, त्यावेळी संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती.
यूपी वॉरियर्स संघाने 1 चेंडू शिल्लक असताना 3 गडी राखून सामना जिंकला आणि प्लेऑफसाठीचे स्थानही पूर्णपणे निश्चित केले. यूपी संघाच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
कृषिमंत्र्यांच्या चुकीवर अनिल देशमुखांनी ठेवलं बोट; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक
या सामन्यात गुजरात जायंट्सची कर्णधार स्नेह राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर संघाने 50 धावांपर्यंत आपले 3 सलामीचे विकेट गमावले. येथून चौथ्या विकेटसाठी डिलन हेमलता आणि अॅशले गार्डनर यांच्यात ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी पाहायला मिळाली, ज्यामुळे गुजरातला या सामन्यात मोठी धावसंख्या करण्याचा मार्गही मोकळा झाला.
डिलन हेमलताने 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची शानदार खेळी केली, तर ऍशले गार्डनरच्या बॅटने 39 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी केली. गुजरात संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावांपर्यंत मजल मारली. यूपी वॉरियर्सकडून पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी गोलंदाजीत 2-2 बळी घेतले.