मुंबईः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता त्याच्याविरोधात पत्नी एंड्रिया हेविट (Andrea Hewitt) हिला दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस (Bandra Police) ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात कलम ३२४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दारूच्या नशेत पत्नी एंड्रिया हिला पॅनचे हँडल फेकून मारल्याचा आरोप कांबळीवर पत्नीने केला आहे. यात एंड्रिया ही जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला जखम झाली आहे. याबाबत एंड्रिया म्हणाले की, शनिवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान हा प्रकार बांद्रा येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये घडला आहे. कांबळीने नशेमध्ये घरी आला. त्यानंतर पत्नीला शिवीगाळ सुरू केली.
कांबळीच्या बारा वर्षाच्या मुलाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु कांबळी शांत न बसता तो किचनमध्ये गेला. पॅनचा हँडल घेऊन पत्नीला फेकून मारला. त्यानंतर मुलालाही शिवीगाळ केली. त्यानंतरही घरातील बॅट घेऊन त्याने पत्नीला मारहाण केली आहे. त्यानंतर एंड्रिया ही हॉस्पिटल उपचारासाठी गेली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी बांद्रा पोलीस ठाण्यात गेली होती.
या घटनेनंतर कांबळी हा घरातून निघून गेला आहे. त्याचा मोबाइलही बंद असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. कांबळी या पूर्वी अनेकदा वादात अडकला होता. गेल्या वर्षी त्याने आपल्या सोसायटीच्या गेटला कारची धडक दिली होती. त्यानंतर त्याने सोसायटीतील लोकांशी हुज्जत घातली होती. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. मध्यंतरी त्याने आर्थिक अडचणीत असल्याची एक मुलाखत दिली होती. त्यानंतर त्याला काही जणांना आर्थिक मदत केली होती. एका संस्थेने नोकरीही दिली होती.