Dwayne Bravo Retirement : वेस्टइंडिज संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने क्रिकेटमधील (Dwayne Bravo) सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्राव्हो सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळ आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच त्याने क्रिकेटमधील सर्व प्रकारांतूनच निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएलमध्येही ब्राव्होने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत ब्राव्हो मुंबई,चेन्नई आणि गुजरात संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. मागील वर्ष ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच 2021 मध्येच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर टी 20 लीग स्पर्धांमध्ये तो खेळत होता. आता मात्र त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वैरी अन् T20 मधला मास्टर; अफगाणिस्तानच्या विजयाचे मैदानाबाहेरचे हिरो
ब्राव्होने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सलग 21 वर्षे खेळणं हा माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. यामध्ये अनेकदा चढ उताराचे प्रसंग आले. सर्वात महत्वाचं म्हणजे या काळात मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझा मेंदू मला आणखी पुढे जाण्यास सांगत आहे पण माझं शरीर तयार नाही. ते आता उत्तर देऊ लागलं आहे. शरीरीत वेदना, तणाव मी सहन करू शकत नाही. मी स्वतःला आता अशा परिस्थितीत टाकू इच्छित नाही ज्यामुळे माझे सहकारी निराश होतील.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ब्राव्हो कोचिंगची जबाबदारी सांभाळत आहे. चेन्नई संघासाठी त्याने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दोन वर्षे काम पाहिले. तसेच अमेरिकेत झालेल्या टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी ब्राव्होची नियुक्ती करण्यात आली होती. ब्रावोने सन 2004 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो सलग क्रिकेट खेळत राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा हजारांपेक्षा जास्त धावा आहेत. 199 एकदिवसीय सामन्यात त्याने 88 विकेट्सही घेतल्या आहेत. टी 20 सामन्यांत ब्राव्होने एकूण 78 विकेट्स घेतल्या. सन 2013 मधील आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाकडून खेळताना ब्रावोने सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा चॅम्पियन खेळाडू आता दिसणार अफगाणिस्तानच्या संघात, बजावणार मोठी भूमिका