वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर (Marlon Samuels) आयसीसीने सहा वर्षांची बंदी घातली आहे. 2019 मध्ये अबू धाबी T10 लीग दरम्यान सॅम्युअल्सने भ्रष्टाचाराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यातील चार प्रकरणात तो 2021 मध्येच दोषी आढळून आला होता. मात्र त्याच्यावर कोणत्या कलमांअंतर्गत, काय कारवाई करायची याचा निर्णय झाला नव्हता. त्याला आता कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. यात त्याला सहा वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. (West Indies cricketer Marlon Samuels has been banned by the ICC for six years.)
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे. 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. शिवाय या दोन्ही टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही तो वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याच्याच बॅटिंगमुळे वेस्ट इंडिजला मोठा स्कोर उभा करण्यात यश आले होते. सॅम्युअल्स हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 11,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.सोबतच 152 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
वेस्ट इंडिजसाठी तब्बल दोन दशके धावांचा रतीब घालणाऱ्या सॅम्यु्अल्सने 14 डिसेंबर 2018 रोजी बांगलादेशविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर 2020 मध्ये त्याने रिटार्यमेंट जाहीर केली. बंदीची घोषणा करताना आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शन म्हणाले, मार्लन सॅम्युअल्स आता निवृत्त झाला आहे. पण गुन्हा घडला तेव्हा तो संघाचा भाग होता. सोबतच आताही तो देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहे. पण पुढील सहा वर्षे तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही.
सॅम्युअल्सवर यापूर्वी 2008 मध्येही पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. ब्रुवारी 2007 मध्ये वेस्ट इंडीजच्या मालिकेतील सामन्यासंदर्भातील महत्वाची माहिती लीक केली होती, असा ठपका ठेवत आयसीसीने सॅम्युअल्सला दोषी ठरवले होते. त्यावेळी त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2010 मध्ये त्याने दमदार पुनरागमन करत 2012 आणि 2016 मध्ये विंडीजला वर्ल्ड चॅम्पियन बनविले होते. या दरम्यान, 2015 मध्ये ICC ने बॉलिंग ऍक्शनमुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती.