Download App

T20 WC : चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात

नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे. त्यानंतर आज (दि.4) भारतीय संघाचं भारतात आगमन झालं. नवी दिल्लीत भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. या भेटीदरम्यान फोटोसेशन करण्यात आले. यातील एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, चर्चेच्या केंद्रस्थानी टीम इंडिया नव्हे तर, पुन्हा एकदा मोदीचं आहेत. (Why PM Modi Not Touching Team India T20 World Cup Trophy)

मोदींच्या फोटो सेशनची चर्चा

मोदी कोणत्याही ठिकाणी गेले की त्यांचे फोटो काढले जातात. विरोधकांकडून मोदींच्या या फोटोसेशनवर नेहमी टीका केली जाते. ज्या ठिकाणी कॅमेरा असतो तेथे मोदी चर्चेत राहण्यासाठी आवर्जून पोज देतात असे विरोधकांकडून नेहमी बोलले जाते. आजही मोदींनी भारतीय संघासोबत काढलेल्या फोटो मागेही असाच त्यांचा हेतू असेल असे अनेकांना वाटू शकते. मात्र, मोदींची ही कृती चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमाचे तंतोतंत पालन करण्यासाठी केलेली आहे.

मोदींच्या टीम इंडियासोबत भरपूर गप्पा

भारतीय संघाचं दिल्लीत आगमन झाल्यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवास्थनी दाखल झाले. येथे मोदी आणि भारतीय संघातील खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास हसत खेळत गप्पा झाल्या. या गप्पांचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात मोदी खेळाडूंसोबत अतिशय मनमोकळपणाने गप्पा मारताना दिसून येत आहेत. या गप्पांनंतर मोदींनी भारतीय संघ आणि जिंकलेल्या चषकासोबत फोटोदेखील काढले, याच फोटोची आणि मोदींनी केलेल्या कृतीची सध्या चर्चा सुरू आहे.

मोदींनी नेमकं काय केलं?

मोदींच्या निवासस्थानी रंगलेल्या गप्पांनंतर टीम इंडियाने जिंकलेल्या ट्रॉफीसह मोदींनी खेळाडूंसोबत एक ग्रुप फोटो काढला. या फोटोत मोदींच्या डाव्या हाताला द वॉल म्हणजेच राहुल द्रविड तर उजव्या हाताला हीट मॅन म्हणजेच भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार कॅप्टन रोहित शर्मा उभा असून, हातात जिंकलेली ट्रॉफी आहे. प्रथमदर्शी हा फोटो बघताना ही ट्रॉफी मोदींनी धरली आहे असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ही ट्रॉफी मोदींनी नव्हे तर, रोहित आणि राहुल द्रविडने धरली असून, मोदींनी केवळ या दोन्ही खेळेडूंच्या हाताला स्पर्श केलेला आहे.

मोदींनी हातात का नाही धरली T20 चषकाची ट्रॉफी?

एखादा संघ किंवा व्यक्तीने जिंकलेल्या ट्रॉफी/पदकाला केवळ संघ किंवा खेळाडूंनीच स्पर्श केला पाहिजे, असा अलिखित नियम आहे. याच नियमाचं तंतोतंत पालन करत मोदींनी फोटोसेशनवेळी जिंकलेल्या ट्रॉफीला हात न लावता केवळ खेळाडूंच्या हाताला स्पर्श केला आहे. सध्या मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

शुक्रवारी खेळाडू घेणार CM शिंदेंची भेट

मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय संघाची मुंबईत ओपन बसमधून विजयी रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.5) भारतीय संघातील चार खेळाडू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल शुक्रवारी (दि.5) विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. ते म्हणाले की, ‘आजचा मुंबईतील कार्यक्रम बीसीसीआयने आयोजित केला आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह टीम इंडियाचे मुंबईतील खेळाडू उद्या महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एमसीएचा सदस्य असल्याने मी खेळाडूंना आमंत्रित केले होते आणि त्यांनी माझे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सरनाईक म्हणाले.
follow us

वेब स्टोरीज