Ravi Shastri On Virat Kohli And Rohit Sharma Retirement : कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटीतून निवृत्त होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही (Rohit Sharma) रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शेवटची कसोटी मालिका असेल का?, याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.
चार वर्षांचे क्रिकेट बाकी
विराट कोहलीचे अजून तीन ते चार वर्षांचे क्रिकेट बाकी आहे, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. पण, रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटमध्ये बराच काळ चांगल्या फॉर्मसाठी झुंजत आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार असलेल्या रोहित शर्माने भविष्याचे आकलन करणे गरजेचे आहे. विराट कोहली काही काळ खेळेल असं मला वाटतं. मला वाटतं की, विराट कोहली पुढील तीन-चार वर्षे खेळेल. पण रोहित शर्माला लवकरच भविष्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं मत रवी शास्त्रीने व्यक्त केलं आहे.
रोहित शर्मा कुठे चुकतोय?
रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर रवी शास्त्री म्हणाले की, तो कदाचित काही वेळा शॉट्स खेळण्यास उशीर करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या शेवटी त्याने निर्णय घ्यावा. याशिवाय, रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीतील तांत्रिक समस्या, विशेषतः त्याच्या पुढच्या पायाच्या हालचालींकडे लक्ष वेधले. रवी शास्त्री म्हणाले की, रोहित शर्माचा पुढचा पाय चेंडूकडे पाहिजे तसा जात नसल्याचे आपण मालिकेत अनेकदा पाहिले आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटमधील त्यांच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
कसोटी सामन्यात भारताचा पराभव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.