जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची आवृत्ती दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. आता दोन दिवसांनी त्याचा अंतिम सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडणार आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीत एकही भारतीय नाही.
भारताकडून पुजाराच्या सर्वाधिक धावा
चेतेश्वर पुजाराने 2021-2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक 887 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पुजारा 19 व्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली (869 धावा) 22व्या तर ऋषभ पंत (868 धावा) 23व्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांनी 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उस्मान ख्वाजाने 1608 धावा केल्या आहेत. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या मार्नस लबुशेनच्या 1509 धावा आहेत. याशिवाय स्टीव्ह स्मिथने 1252 आणि ट्रॅव्हिस हेडने 1208 धावा केल्या आहेत.
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच
टीम इंडिया याआधीही WTC फायनलमध्ये पोहोचली
विशेष म्हणजे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी, 2021 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या वर्षी विराट कोहली टीम इंडियाची कमान सांभाळत होता. आणि यावेळी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.