The Great Khali : WWE दिग्गज ‘द ग्रेट खली’ ने व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुडघ्याच्या समस्यांमुळे आपण आता पूर्णवेळ रेसलिंग करु शकत नाही असं त्याने एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. WWE मध्ये भारताची ओळख निर्माण करणारा खली ची कारकीर्द अत्यंत प्रभावी होती. 2006 ते 2014 या कालावधीतील त्याची कारकीर्द जबरदस्त होती. त्याने ‘वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप’चे विजेतेपदही पटकावले होते. त्याने ‘द अंडरटेकर’, ‘बिग शो’, ‘जॉन सीना’ आणि ‘केन’ यांसारख्या दिग्गजांशी सामने खेळले. जरी खली गेल्या काही वर्षांपासून रिंगमध्ये सक्रिय नसला, तरी चाहत्यांना तो एका शेवटच्या सामन्यासाठी WWE रिंगमध्ये परत येईल अशी आशा होती. मात्र, आता हे शक्य नाही, कारण खलीने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता त्याची उपस्थिती रिंगमध्ये दिसणार नाही.
WWE दिग्गज ‘द ग्रेट खली’चे महत्त्वपूर्ण विधान
‘इनसाइट विथ ख्रिस व्हॅन व्लिएट’ (Insight with Chris Van Vliet) या कार्यक्रमातील अलीकडील एका मुलाखतीत, ‘द ग्रेट खली’ला विचारण्यात आले की त्याने व्यावसायिक रेसलिंगमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली आहे का. त्यावर त्याने त्वरित होकारार्थी उत्तर दिले. गुडघ्याच्या समस्यांमुळे आपण आता पूर्णवेळ रेसलिंग (Professional Wrestling) करु शकत नाही, असे खलीने स्पष्ट केले.
तो म्हणाला, “काही सांगता येत नाही. कदाचित एखाद्या दिवशी WWE ने विचारले तर मी जाऊ शकेन फक्त एक किंवा दोन दिवसांसाठी. पूर्णवेळ नाही. माझ्या गुडघ्यांच्या समस्येमुळे मी पुन्हा कधीही पूर्णवेळ रेसलिंग करु शकत नाही.”
WWE कडून ‘द ग्रेट खली’चा सन्मान
WWE सोबतचा ‘द ग्रेट खली’चा करार 2014 मध्ये संपला. त्यानंतर त्याने रिंगमध्ये अधूनमधून हजेरी लावली. 2017 मध्ये, ‘बॅटलग्राउंड’ (Battleground) या कार्यक्रमात रँडी ऑर्टनविरुद्धच्या सामन्यात जिंदर महलला मदत करण्यासाठी तो उपस्थित राहिला होता. तसेच, 2018 मध्ये ‘ग्रेटेस्ट रॉयल रम्बल’ (Greatest Royal Rumble) सामन्यातही त्याने सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये कंपनीने खलीला ‘हॉल ऑफ फेम’मध्ये (Hall of Fame) स्थान देऊन एक मोठा सन्मान दिला.
