मुंबई : देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. आज 15 तारीख आहे. मात्र अद्याप 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह तसेच इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहे. याविरोधात विरोधकांनी येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे प्रकरण गंभीर आहे. घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंसारख्या महापुरुषांविषयी अपमानास्पद बोलत असेल आणि सरकार याचे खुले समर्थन करत असेल, तर हे अत्यंत निषेधार्ह आहे. याविरोधात मोर्चा का काढू नये? मोर्चा काढू नये असे वाटत होते, तर आत्तापर्यंत राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. अजून ती कारवाई झालेली नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच, असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
जनता या महामोर्चात उतरणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल, असंही राऊत म्हणाले.