पुणे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.31 डिसेंबर) पुणे शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज शहर परिसरात 2700 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ गोंधळ तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
संपलेल्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या विविध भागात महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, एबीसी फार्म रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात गर्दी करतात. यावेळी अनेकांकडून मद्यपान करून गोंधळ घातला जातो. यामुळे काही अनुचित प्रकार याआधी घडले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, आज काही अनुचित घटना घडल्यास नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यासाठी 02026126296, 8975953100 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी नियमाचे पालन करून पोलिसांनी दिलेली सूचनाचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.